शेती शाळेत रमणा-या कृषी सहाय्यक प्रियंका पाटील
मावळमित्र न्यूज विशेष:
ती शिकली…सावरलेली…अन ती हुशारही…प्रत्येक वर्गात ती पहिल्याच क्रमांकाने उत्तीर्ण व्हायची..कबड्डी हाही तिच्या आवडीचा खेळ..ती कथ्थक करते..सुख पायाशी लोळण घेतात तिचे बालपण सरलं…लेकीने शिक्षिका होऊन सावित्रीचा वसा चालावा हे आइचे स्वप्न..लेकीने डी.एड पूर्ण केले. पण खडू डस्टर मध्ये न रमता…ती शेतीच्या वावरात रमली..शेतीचा बांध कधीही पाहिलेल्या लेकींनी शेती समृद्धी साठी घेतलेले सतीचे वाण अभिमानास्पद असल्याने तिच्या आई वडीलांना ऊर अभिमानाने भरून येतो..
आई वडीलांच्या आनंदा शिवाय आयुष्यातील सर्वात मोठी कमाई ती कोणती,ही कमाई टिकवून ठेवण्यासाठी लेकही माझ्या बळीराजाच्या शेतावर जाऊन ‘ शेतकरी महिलांना शेतीशाळा घेऊन,समृद्ध शेतीचे धडे देत आहे.सावित्रीच्या या लेकी कडून शेतीच्या झाडाखाली बसून कित्येक भगिनी शेती शाळेत,समृद्ध शेतीचे धडे गिरवत आहे. तिने दिलेल्या धडयातून समृद्ध शेतीकडे सूरू असलेली वाटचाल निश्चित प्रेरणादायक आणि अनुकरणीय आहे.सावित्रीच्या वाटेने जाऊन,चार भिंतींच्या वर्गात ज्ञानदान न करता समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत जाऊन ती शेतीचे  ज्ञानदान करीत आहे.कृषीप्रदान असलेल्या महाराष्ट्रात या शेतीशाळेची मुहूर्तमेढ रोवणा-या त्या पहिल्याच कृषी सहायक असतील.
प्रियंका शरद पाटील असे या शेतीशाळा घेणा-या ताईंचे नाव.त्या नवलाखउंब्रे, बधलवाडी,जाधववाडी,मिंडेवाडी,  नाणोली तर्फे चाकण गावच्या कृषी सहायक आहे. शेताच्या बांधावर जाऊन कमी खर्चात शेती कशी करायची. जमिनीचा पोत कसा सुधारायचा,सेंद्रीय शेतीचे फायदे,शेतीत स्त्रीचे महत्व आणि तिच्या जबाबदाऱ्या,पाण्याचे नियोजन,यांत्रिकीकरणाची शेती, परसबाग या विषयाचे धडे आणि प्रात्यक्षिक त्या देत आहे. खान्देशातील ही कन्या मावळच्या मातीत तितकीच रमली. जितकी खान्देशातील दुष्काळी भागात रमून जायची. नोकरीच्या सुरूवातीला तिने दुष्काळग्रस्त भागात पाण्याची पातळी वाढाव म्हणून केलेल्या कामाला आलेल्या यशाचे कौतुक जागतिक बँकेच्या टीमने केले.
आता ती सर्वाधिक पावसाचे आगार असलेल्या मावळात पाणी जपून ‘बिन खर्चात शेती कशी करता येईल यावर राबत आहे. कष्टाचा हा वसा आणि वारसा तिला आजोबांकडून आला आहे.आयुष्यात १२ नोक-या करून सेवानिवृत्त होणारे प्रियंका यांचे  आजोबा  अजबच रसायन होते. जुन्या पिढीतील पदवीधर ही त्यांची ओळख संपूर्ण खानदेशात होती. प्रियंका पाटील यांचा जन्म आणि शिक्षण  दहिवद ता.अमळनेर जि.जळगावात झाले. वडील शरद बाजीराव पाटील गव्हर्न्मेंट सर्व्हिट सोसायटी लि.जळगाव बॅकेचे कक्ष अधिकारी पदावर काम करीत होते. तर आई  नंदा शरद पाटील जळगाव महानगरपालिकेत उपशिक्षिका म्हणून नोकरीला. कुटूबियांतील सर्वच शिकले सावरलेले.
आजोबा बाजीराव तोताराम पाटील हे बी.टी.पाटील नावाने लोकप्रिय होते. सन १९४४ साली ते  पदवीधर  होते. आर्टस शाखेत पदवीधर असलेल्या बी.टी.इतिहास आणि इंग्रजी विषयात निष्णात होते,या दोन्ही विषयावर त्यांची कमांड होती.
  बडोदा कालेजात  बी.टी.यांचे  शिक्षण झाले. त्यांनी एकूण बारा नोक-या केल्या. अमळनेर नगरपालिकेत मुख्य अधिकारी पदावरून नोकरीला सुरुवात केली अन पुढे अकरा नोक-या करीत  शेवटी डी.एड.काॅलेज प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.या दरम्यान,अन्न धान्य वितरण पुरवठा अधिकारी,माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक अशा वेगवेगळ्या अकरा नोक-यास त्यांनी केल्या , तत्त्वाशी तडजोड केली नाही. आजी शांताबाई बाजीराव पाटील याही जुन्या मॅट्रिक शिकलेल्या. पाच भाऊ तीन बहिणीचे कुटूंब. प्रियंका यांचे वडील सर्वात लहान. सगळी भाऊ नोकरी व्यवसायात,बहिणी प्रपंचात रमलेल्या.
प्रियंका यांचे रावसाहेब रूपचंद राठी विद्यालयात पहिली ते दहावीपर्यंत सेमी इंग्लिश शिक्षण घेऊन, कृषी विभागाची पदविका महात्मा फुले  कृषी विद्यालय घेतली. ऐवढया शिक्षणावर थांबतील त्या पाटील कसल्या. त्यांनी  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बी.एस.सी.अँग्री पूर्ण केले. आर्टस मधून बहिस्थ  राहून आर्टस मधून बारावी केले. पुढे डी.एड पूर्ण केले. लेकीने आई सारखे शिक्षिका व्हावी असे  आई आणि वडीलांचे  स्वप्न होते.पण लेकीची ओढ मातीत होती.कृषी विभागात तिने स्वतःला झोकून दिले. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्याच्या खंडाळा,अंजिठा,हडदा परिसरात नोकरीचा श्रीगणेशा केला.सात वर्षे नोकरीत केली. आई आजी  कै.जनाबाई साळुंखे या शिक्षिका होत्या  ग.स.सोसायटी,जळगाव येथे संचालक पद भुषवले होते.त्यांचाही प्रियंका यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला.
या काळात पाटील यांन  जलयुक्त शिवार योजना प्रभावी पणे राबवली. परिणामी गावाची पाणी वाढवली. यासाठी शासनाच्या कृषी विषयक योजना प्रभावी पणे  राबवल्या.शेततळे खोदली,सीसीटी केले. माती नाला बंधारा बांधला,सिमेंटचे नाला बंधारे बांधले. अशा अनेक कामे मार्गी लागली. लोक सहभागातून जुई नदीपात्राची रुंदी आणि खोलीकरणाचे दीड कोटीचे काम झाले. परिणामी पाण्याची साठवणूक वाढली. पाणी पातळी टिकून राहीली. पोखरा प्रकल्पांतर्गत शेतक-यांना  सुमारे अकराशे जल संजीवनी डोस दिला. त्यामुळे शेतक-यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावला.
जिथे कापूस पिकायचा, वर्षभराचे हे एकच पीक  ,ज्या पिकाचा भाव ठाऊक नसायचे. त्यामुळे शेतकरीवर्ग कायमच चिंतातूर असल्याचा. हडदा,डखला गावातील गावकरी  तर बायका पोरांसह अहमदनगरला ऊसतोडीला यायचे.पण  या गावात  जल संजीवनी योजना राबवल्या मुळे पाण्याची पातळी वाढली. कृषी विभागाच्या योजना  घरोघरी पोहोचवल्या परिणामी शेतक-यांनी पाॅलीहाऊस उभे केले. ठिबक सिंचन करून फळशेती केली. मिरची,आदरक यांचे उत्पन्न वाढले.
अ‍ॅपल बोरांची नवी  जात  विकसित केली. तिची मागणी महाराष्ट्र भर वाढली. या योजनेत प्रियंका पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. या कामाची दखल घेत जागतिक बॅकने या गावांना भेट देऊन या प्रकल्पाचे कौतुक केले.
तेथून बदली होऊन  पाटील मावळ तालुक्यात आल्या. दुष्काळग्रस्त भागातील कामांचा अनुभव घेऊन,पावसाळी भागात भात,सोयाबीन,ऊस या पिकावर काम करीत आहे. नवलाखउंब्रे बीटात सहायक कृषी अधिकारी म्हणून काम करीत आहे. महिला शेती शाळावर त्यांचा जोर आहे. शेती ही महिलांची कष्टावर फुलते,म्हणून तिला शिक्षित करणे,तिचा आत्मविश्वास वाढवणे यासाठी त्या सतत धडपडत आहे.
महिलांसाठी शेतीशाळा,नियंत्रित बाजार, भात बियाणे संशोधन करतोय. व  प्रात्यक्षिक दिली जात आहे. महिलांच्या शेती शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जात आहे. महिलांची शेतीशाळा झाल्याने त्यांना,पिकावरील मित्रकीड कळते ,शत्रुकीड कळते,त्यावरील उपाय हाही त्या सहज करीत आहे. हेच शेती शाळेचे फलित असल्याचे नाणोली तर्फे चाकण,बधलवाडी,नवलाखउंब्रेत पहायला मिळेल.
सेंद्रीय शेतीवर काम करायचे आहे.
विषमुक्त धान्य,फळे बाजारात आणि विकली पाहिजे असा अट्टाहास आहे. प्रियंका पाटील या कबड्डी खेळाडू असल्याने जिल्हा व राज्यस्तरावर अनेक पारितोषिक मिळवले आहे. कृषी विभागाने घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत मावळ तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत आहे. कथ्थक नृत्य हा प्रकार त्यांच्या आवडीचा आहे. या विषयात त्यांनी प्राविण्य मिळवले असून कथ्थक विशारद त्या आहेत. ही कला त्या जोपासण्याचा त्या जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे.शेतीवर निष्ठा आणि  श्रद्धा असलेल्या पाटील मॅडम यांचे घरातून,सासरी,मोहरी खूप कौतुक झाले. शेतकरी बांधवांच्या घरापर्यंत कृषी योजना पोहचल्या. त्याने बळीराजाच्या जगण्यात सुखाचे चार दिवस येऊ लागले.
पाटील मॅडम यांच्या कार्याची दखल घेत,महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने २६.१.२०१४ रोजी उत्कृष्ट कृषी सहाय्यक म्हणून मा.ज.ज.जाधव सो. विभागीय कृषी सहसंचालक यांचे हस्ते पुरस्कार.मौजे.खंडाळा गावच्या/ग्रामपंचायत वतीने दि. २६.२.२०१६  ला आदर्श कृषी सहाय्यक पुरस्कार देऊन गौरविले आमदार अब्दल सत्तार यांचे हस्ते १५.७.२०१५ ला उत्कृष्ट कृषी सहाय्यक पुरस्कार सन्मान केला. कृषी विभागाने कौतुक केले. सुख सुख म्हणजे काय हे अनुभवत असताना प्रियंका ताई यांच्या आयुष्याला दु:खाचा बांध आडवा आला.
एका अल्पशा आजाराने पतिराज यांचे देहावसान झाले.पाच वर्षात संसार मोडला.प्रियंका ताईना आई,वडील यांनी  धीर दिला.सिद्धेश्वर हा भाऊ पाठीशी खंबीर पणे पाठिराखा म्हणून उभा राहिला.ताईच्या आयुष्यातील सर्वात मोठी ठेव त्यांचा लाडका चिरंजीव चिन्मय आहे. आयुष्याची ही सर्वात मोठी पुंजी आहे. तिला जपायची.तिला सांभाळताना पृथ्वीची खरी संपदा, स्वच्छ जल, स्वच्छ वायू आणि स्वच्छ मृदा आहे तिचीही जपवणूक करायची हेच आयुष्याचे सुत्र ठरले असल्याचे त्या आत्मविश्वासाने सांगतात.
प्रमिला मडके कृषि विभाग, आंबेगाव येथे  सहाय्यक कृषीअधिकारी म्हणून कार्यरत आहे.त्या प्रियंका यांची  जिवाभावाची मैत्रीण आहे.  खंबीरपणे प्रत्येक सुख-दुखा:त सोबत असतात. आपले दु:ख बाजूला ठेवून समाजासाठी राबणारे कित्येक हात आपल्याला जागोजागी पहायला मिळतील.या हातात  प्रियंका पाटील याही दोन हाताची भर पडली. समाजासाठी राबणा-या हातांना हात बळकटी मिळावी अशी वरुणराजाच्या चरणी प्रार्थना.( शब्दांकन- सौ.अर्चना रामदास वाडेकर)

error: Content is protected !!