वडगाव मावळ:
वडेश्वर पंचक्रोशीतील कुलस्वामिनी आणि नवजात शिशूचे नशिब लिहणारी देवी सटवाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
मावळतील प्राचीन सटवाई माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही देवीची घटस्थापना करून नवरात्र उत्सवास उत्साहात सुरूवात झाली आहे. नवरात्रनिमित्त सटवाई माता मंदिरात सजावट करण्यात आली. तसेच मंदिरात फुलांची सजावट करून सकाळी देवीची भक्तीभावाने आरती करून घटस्थापना करण्यात आली. अशाप्रकारे पारंपारिक पद्धतीने नवरात्र उत्सव याठिकाणी साजरा होत आहे.
आंदर मावळातील वडेश्वरपासून सुमारे तीन किलोमीटर डोंगर माथ्यावर पायी जाऊन देवीचे दर्शन घेता येते. आदिवासी समाजाची कुलस्वामिनी म्हणून ख्याती असलेले सटवाई देवीचे हे महाराष्ट्रातील एक मंदिर असल्याचे बोलले जात आहे. मार्च महिन्यात पौर्णिमेला येथे देवीची मोठी जत्रा भरते. आदिवासी समाज देवीची पूजाअर्चा केल्यानंतरच शेतीची कामे सुरू करण्याची प्रथा आहे. जंगलात वसलेल्या या देवीला दूर दूरवरून भावीक मोठया श्रद्धेने दर्शनासाठी येतात. नऊरात्रीत नऊ दिवस याठिकाणीला जत्रेचे स्वरूप येते. सटवाईदेवीचे मंदिर हे खूप प्राचीन असल्याचा अंदाज आहे कारण मंदिरासमोरच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पूर्वी कातळात काही टाके कोरण्यात आलेले आहेत. डोंगररांगेवरील घनदाट झाडीत वसलेले हे मंदिर निसर्गप्रेमींसाठी आनंदाचा विषय आहे. तसेच जागृत देवस्थान असल्याने भाविक मोठया श्रद्धेने याठिकाणी येत असतात. महिलांना मूल होत नसल्याने याठिकाणी येऊन नवस मागितल्याने मूल होण्याची इच्छाही ही देवी पूर्ण करते असे येथील पुजाऱ्याने सांगितले.
सटवाई देवी ही देवी नवजात शिशू बालकांचे भविष्यलेखन करणारी देवता आहे असा हिंदू पुराण कथांमध्ये लिहिले आहे. या आई सटवाई देवीस सटवी, सटुआई, सटवीका इत्यादी नावांनी ओळखले जाते. नशीब देवता असेही म्हणतात. सर्वसाधारणपणे बाल अथवा बालिकेचे जन्माचे पाचव्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. असा एक समज आहे कि सटवाई देवी ही कोणत्याही रूपाने येऊन त्या बालकाचे विधीलिखित लिहिते. एक कोरा पांढरा कागद, पाटी व पेन पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते. झोपेत हसणाऱ्या बाळास ‘सटवाई हसविते’ असाही एक समज आहे.
याच परिसरातील वडेश्वर  आणि करंजगाव पठाराच्या मध्यावर कमलजादेवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी होत आहे.माऊची कडजाई,फळणेला भैरवनाथ महाराज मंदीरातही नवरात्रोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी च्या वरसुबाई मंदीरात अखंड नंदादीप तेवत असून भाविकांची दर्शनाला गर्दी होत आहे.

error: Content is protected !!