राज्यातील तरुणांना ‘गाजर’ नको, रोजगार द्या – आदित्य ठाकरे
वडगाव मावळ :
राज्यातील तरुणांना रोजगार हवा आहे. मात्र आताचे सरकार त्यांना गाजर दाखवत आहे. आताच्या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा गुजरातने घेतला. आता सत्तेवर महाविकास आघाडी सरकार असते तर वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात आणलाच असता. असे प्रतिपादन माजी मंत्री शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे  यांनी केले.
वडगाव मावळ येथे शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात ते बोलत होते. त्यावेळी संपर्क प्रमुख आमदार सचिन आहिर, सहसंपर्क प्रमुख अदित्य शिरोडकर, उपनेता रघुनाथ कुचिक, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, भारत ठाकूर, सुरेश गायकवाड, युवा नेता राजेश पळसकर, युवा सेना जिल्हा प्रमुख अनिकेत घुले, मदन शेडगे, सतीश इंगवले, डाॅ विकेश मुथा, सुनंदा आवळे आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे  म्हणाले,” रोजगारांसाठी तरूणांना लाठीकाठी खावी लागते हे दुर्दैव आहे. राज्यातील सध्याचे सरकार नसून ती एक सर्कस आहे. सद्यस्थितीत राज्यातील तरूणांचा रोजगार  हिरावून गुजरातला नेला. आपले सरकार असते तर हा प्रकल्प आणलाच असता महाविकास आघाडी सरकारच्या काळात रोजगार मिळाले. हे सरकार ‘खोके सरकार’ आहे. महाविकास आघाडी सरकारने ऐंशी हजार कोटीची गुंतवणूक आणली. आम्ही या प्रकल्पाला दहा हजार कोटीची सबसिडी देणार होतो. गुजरातला प्रकल्प गेला आहे. तिकडे, वीज, पाणी सोयी सुविधा नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 
खोके सरकार निश्चित पडणारच लिहून घ्या. त्यांच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प गेला आहे. हा प्रकल्प इथे आला असता तर 80 टक्के भूमिपुत्रांना रोजगार मिळाला असता, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ठाकरे म्हणाले,” चाळीस गद्दार आमदारांबरोबर मीही राजीनामा देतो, सर्वांनी निवडणुकीला सामोरे जाऊ असे विरोधकांवर हल्लाबोल केला.
आम्ही केंद्राला किंवा गुजरातला दोष देत नाही, हा दोष खोके सरकारचा आहे. महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचा फायदा गुजरातने घेतला. सद्यस्थितीतील राज्याचे मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही. माझ्या गटात कोण येतेय, त्यापेक्षा महाराष्ट्रात रोजगार कोण आणतंय ते पहावे. आमच्यावर चाळीस वार केलेत पण राज्यातील जनतेवर वार करून नका.
गुंडाराज, भाईराज हे वागणे बंद करा अन्यथा तुम्हाला राज्यात फिरून देणार नाही. महाराष्ट्रात जे काय चालले आहे ते योग्य आहे का? रोजगार हिरावून घेऊन गेलात, महाराष्ट्राला रोजगार  टाटा बाय बाय करून निघून गेला.
सत्यमेव जयते, सत्तामेव नाही. रोजगार हा अभिमानाचा प्रश्न आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील तरूणांना रोजगार मिळवून देणारच अशी शपथ घेतो.

error: Content is protected !!