बाबा,आपलं वाडा गाव कसं होतं
नातवाचं कुतूहल,आजोबांच्या डोळ्यात तरळलं पाणी
मावळमित्र न्यूज विशेष:
वेळ सकाळची होती.कोवळ्या उन्हात आपल्या दहा वर्षाच्या नातवा सोबत शंकरराव ओसरीवर बसले होते.त्यांचा नातू सूरज खूपच जिज्ञासू वृतीचा होता.त्या दिवशी त्याने आपल्या आजोबाला बरेच प्रश्न विचारले होते. बाबा हे वाडा गाव कसे होते? ते कधी धरणग्रस्त झाले ? ,असे अनेक  नानाविध प्रश्न सूरज आपल्या आजोबांना विचारू लागला होता.
लहानपण म्हणजे जिज्ञासू वृत्ती असते नेमके  तेच सूरजच्या बाबतीत झाले होते. शंकरराव त्याला सांगू लागले होते.वाडा गाव म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श झालेलं गाव होत.या गावाला भीमा आणि  आरळा या दोन नद्यांचा सहवास लाभला होता.भीमाशंकरच्या अभय अरण्यातून या दोन्ही नद्याचा उगम झालेला आहे.भीमा नदी एका कुंडातून बाहेर झाली.
परंतु मध्येच गायब होऊन ती कोटेश्वर जवळ दिसू लागते व इकडे भीमाशंकर अरण्यालगत रानमळा खूप जंगल झाडीचा मुलुख त्या ठिकाणा पासून आरळा नदी उगम पावून कळमोडी गावच्या शिरोभागी तीच खरे रूप दाखवते या दोन्ही नद्या वाडा गावाला आपल्या कुशीत घेत होत्या.भीमा नदीच्या तीरावर पायरी पायरी बनवून छान घाट केले होते.मल्हारराव होळकरांच्या स्नुषा अहिल्या बाई होळकर यांच्या कारकिर्दित या घाटांच काम झाले होते.
पहिल्या बाजीराव पेशव्यांची  धर्मपत्नी काशी बाई हीच माहेर आणि पेशव्यांची सासर वाडी  असे चास कमान गाव होते.याच चास शेजारी असणाऱ्या वाड्या गावाला त्यावेळी या राज्यकर्त्यांनी हेरले आणि थोडी समाज उपयोगी कामे केली .वाड्यातील सर्व बाया भापडी मंडळी या पायऱ्यांवर कपडे धुण्यासाठी येत होती.या भागातील शेतकरी वर्ग नुकताच दुग्ध व्यवसायाकडे वळला होता.
घरा घरामध्ये चार पाच म्हशी असायच्या त्यांचं दूध डेअरीला घालायच्या उद्देशाने वाड्यामध्ये वाडा ग्रुप दूध उत्पादक संघ तयार झाला होता.त्या डेअरीच्या माध्यमातून भीमा नदीवर एक टोलेजंग पुल तयार झाला होता.माणिकराव नाईकांना बांधकामांचे श्रेय जातं, त्या पुलावरून अवघा पश्चिम पट्टा ये जा करत होता .मावळातून प्रत्येक गावात दूध संकलन केले जात होते .आणि ते दूध या वाड्यात आणले जात होते.तेथून ते शहरी भागात जात होते .त्यामुळे गोर गरीब शेतकऱ्यांच्या हातात थोडा पैसा खेळू लागला होता.
त्या करीता  हा पुल खूप फायदेमंद झाला होता. हा पुल संपला की लगेच शंकराचे मंदिर दृष्टीक्षेपात येत होते. या मंदिरामुळे   वाड्यात जी महाशिवरात्र साजरी होत असे ती अद्वितीय अशी . आंबोली पासून कडूस पर्यंत ,भोरगिरी पासून चास  पर्यंत  या सगळ्या भागातील सगळी गावे महाशिवरात्र साजरी करण्यासाठी येत असे.दिवस भर संगीत भजन होत असे,बेल, फुल , वाहून भाविक त्या भोळ्या शंकराकडे प्रार्थनेची याचना करत असे.मंदिराकडे जाण्यापूर्वी एक अखंड जलस्रोत वहात होता, तिथे पाय धुऊन मगच शंकराचे दर्शन करता येत होते .
कोणाला वाटे हे पाणी ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिले की काय?परंतु हे पाणी मंदिराच्या डाव्या बाजूला एक विहीर होती त्या विहिरीमधून अखंडपणे  वहात येत होते व त्याठिकाणी भाविक मंडळी पाय धुऊन, देवाच भक्तीभावाने दर्शन करून मगच वाडा बाजारपेठेत प्रवेश करत होते.उजव्या हाताने वळलो तर त्याकाळात नव्याने बांधलेले दत्ताचे मंदिर दिसत होते. निसर्गरम्य परिसरात हे मंदिर उदासीनता दूर करत होते.वाडा गावामध्ये प्रवेश करण्यापूर्वी दगडी पायऱ्या चढून जाव लागायचं.या गावा मध्ये अठरापगड जातीचे
लोक बंधू भाव जपत,मोठ्या गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते.प्रत्येक जण आठवड्यातील शनिवारची वाट पहात असायचा, कारण त्या दिवशी आठवडा बाजार होत होता.या बाजाराचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गोष्टीचा बाजार हा ठराविक ठिकाणीच होत होता.  वाडा गावाला शुध्द पाणीपुरवठा तिफनवाडीतील माळावर एक जल  शुद्धीकरण टाकी बसवली होती तिथून होत होता.राजगुरुनगर  ते  वाडा हे अंतर हे जेमतेम 28 किलोमिटर होते . या मार्गे  आल्यानंतर शितलाई देवीचे मंदिर लागत होते.त्या मंदिरा लगत रोडवर काळा घेवडा,फरशी,याचा मोठा बाजार भरत असे.
समोरच  दिवंगत अनंत शेठ केदारी यांची  राईस फ्लोअर मिल मोठ्या थाटात उभी होती. तिच्या बाजूने मावळ पट्ट्यात तसेच वाडा डेअरी आणि हायस्कूल या कडे रोड जात होता. बाजूला एस. टी.स्टँड असल्याने कायमची वर्दळ तिथे दिसून येत होती. शेजारीच मराठी शाळा व तिच्या समोर मोठे पटांगण या वर पावसाळा गेल्यानंतर तमाशाचे फड रंगत होते. एस. टी. स्टँड पासून थोडे पुढे आले की वाडा गावच्या ग्रामपंचायतीची सुंदर इमारत दिसत होती.ग्रामपंचायत लगत एक मोठा चौक होता.त्याला नेहरू चौक म्हणून ओळखले जायचे याच नेहरू चौकात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेली भाजी हीचा खूप मोठा बाजार लागत होता.
सरळ रोड गेला होता डेअणे व वरील आदिवासी पट्ट्यातील गावांकडे त्या रोड वर एक विशिष्ट पूर्ण वास दरवळत असे तो म्हणजे सुक्यामासळीचा, या ठिकाणी वाकट,बोंबील, खारा मासा, झिंगा,असे गोर गरीबाला परवडेल अशा भावात ती मासळी मिळत होती.पावसाळा सुरू होण्यापूर्वी तीन महिन्यांसाठी मावळातील लोक याचा  वापर करत  व आडल्या नड लेल्या वेळी हेच कामाला येत होते.त्या बाजारा लगत वर पावसाळा गेल्यानंतर शेत रिकामी होत होती त्या ठिकाणी शेळ्या, बोकड, कोंबड्या, याचा बाजार लागत होता. नेहरू चौकातून सरळ जर पुढे गेलो की मसाले वाले रंगीबेरंगी पाल ठोकून बसत होते .
गरम मसाला, गोडा मसाला, कांदा मसाला, अशा अनेक प्रकारच्या मसाल्यांच्या वासाने ठसका आला नाही तर नवलच, थोडे पुढे  डाव्या हाताला सरकलो की, सरकारी दवाखाना मोठ्या रुबाबात उभा होता गोर गरीबांना याचा खूप फायदा झाला होता. दवाखान्या समोर रोडवर एका कोपऱ्यात कातकरी लोक नदीत मिळालेलं मासे विकण्यासाठी बसत होते. व लगतच तांदळाच्या अनेक जातीचा बाजार होत होता .चालताना त्या तांदळाच्या सुवासाने मन प्रफुल्लित होत होते.जिरा, कोळंबि, रायभोग,इंद्रायणी,अशा विविध जातीचा तांदूळ त्या ठिकाणी विकायला येत होता,थोडे पुढे लाकडाच्या वखारी दिसत होत्या.
  तर चार हात लांब वाडा गावचे ग्रामदैवत धर्म राजाचे साधे पण तितकेच उत्कृष्ट चौमोळी कौलारू मंदिर दिसत होते.याच देवाची यात्रा बीज म्हणून साजरी केली जात होती.या बिजेला बरीचशी गावे आपलीच यात्रा म्हणून हजेरी लावत होती.या यात्रेची चाहूल एक महिना अगोदरपासूनच लागायची तिची तयारी करण्यासाठी मोठी कसरत सगळ्यांना करावी लागायची. बैल गाड्यांच्या शर्यती, पहिलवानांचे कुस्त्यांचे आखाडे,तमाशाची बारी,वाड्यातील तरुणांनी बसवलेलं नाटक,या सर्वांची सगळे आतुरतेने वाट पहात असायचे .धर्म राजाचे मंदिर सोडले की वाडा गावाला  बऱ्याच वाड्या  वस्त्या होत्या.
  त्या वाड्यांकडे जाण्यासाठी तो रस्ता जात होता.त्या वाड्या सुखाने एकत्र नांदत होत्या .परत माघारी नेहरूचौकात आल्यानंतर मुख्य बाजारपेठेत प्रवेश करता येत होता.सुरवातीला तिथे त्रिमूर्ती हेअर सलून लागत होते.तिथे वाड्यातील राजकारणाच्या गप्पा रंगत असायच्या. वाड्यातील मिसळ म्हटली की भल्याभल्या माणसांना तिची चव घेण्यासाठी भाग पाडल्या खेरीज राहत नव्हती. ती मिसळ सगळ्या हॉटेल मध्ये मिळत होती.मग ते पावडे, धनुशेठ,अहमद शेठ,यापैकी कोणाचेही असो चव ही सारखीच असायची .काजळे डॉक्टरचा नवीनच हॉस्पिटल युक्त दवाखाना दिसत होता.बाजूला दिवंगत बाळासाहेब शेटे यांची पीठ गिरणी दिसत होती.त्याच रांगेत धनुशेठ चे हॉटेल,हरखाशेठ, ओसवाल,पोटभरे यांची दुकाने होती.त्यांच्यासमोर कहाने वडा पाव आपल्या  आस्वादा ने सगळ्यांचे लक्ष खेचत होता.शांताराम बापू केदारी यांचे स्टेशनरी चे दुकान म्हणजे वाडा बाजार पेठेच भूषण होते.
  कारण सदाकाळी विद्यार्थी त्या ठिकाणी काही तरी खरेदी करताना दिसत असायचे. बाजूला मारुती रायाचे मोठे मंदिर होते.समोर कुंभार आळी कडे. रोड जात होता.तिथे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी खते,अंबवण पेंड,यासाठी शहाबुद्दिन आपले दुकान चालवत होते.बाजूला हसन सायकल मार्ट ,पुढे सगळ्या वाड्यात एकमेव घड्याळ दुरुस्तीचे दुकान म्हणून नाईक वाच मेकर यांचे दुकान होते.परत माघारी आलो की अहमद शेट यांचे मिसळी चे मोठे हॉटेल होते.बाजूला मुस्लिम लोकांसाठी एक मस्जिद होती.या बाजारपेठेचा उल्लेख म्हणजे एक कांदबरी होईल. सरळ पुढे नवनीतचे कपड्याचे दुकान,बाजूला पोलीस चौकी,होती.सरळ पुढे प्रभाकर कंपनीचे मेडिकल स्टोअर ,समोर जैन धर्माचे संस्थापक महावीर जैन, यांचे मंदिर  दिसत होते .शांती भाईचे कपड्याचे दुकान, पुढे किराणाचे सुध्दा त्यांचेच दुकान मोठ्या संख्येने चालत होते.ही मोजकीच दुकाने मी तुला सांगत आहे असे शंकरराव सूरजला समजावत होते. 
  महाराष्ट्र बँक आणि  पोस्ट ऑफिस  आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते.पुढे कोपऱ्यावर रामाचे प्रशस्त मंदिर होते.त्या मंदिराच्या बाजूला तांबटकर आळी,शिंपी आळी,पुढे ब्राह्मण वाडे होते.हे वाडे पुरातन वास्तूंचे अवशेष जतन करत होते.रामाच्या मंदिरा पासून वळण घेतले की भोई समाज राहत होता.लगतच  शांताबाई चे आदिवासी वसतिगृह व थोडे पुढे तुझे वडील ज्या ठिकाणी  माध्यमिक शाळा शिकले ते रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर विद्यालय वाडा दिसत होते.ही शाळा म्हणजे अवघ्या मावळातील शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षणाची पंढरीच होय .शाळेच्या पूर्वेला वाडा डेअरी तिच्या वेगळ्या अंदाजात उभी होती.
  शाळा आणि डेअरी यांच्या मध्ये बैलगाड्यांच्या शर्यती चा मोठा घाट होता .एवढ्या उंचावर हा घाट परंतु बैल 10 ते 11 सेंकदात पार करत असे. नदीचं पात्र पार केले की  किनारी जानुबाई चे साकुर्डी ग्रामस्थांचे मंदिर दिसत होते .असे हे  संस्कृती  संपन्न  वाडा गाव म्हणजे सोयरिक जमवण्याचे एकमेव ठिकाण होते. सूरजला सांगत असताना शंकरराव पूर्ण भा्वुक झाले होते.कारण त्यांची हयात तिथे गेली होती .कोणाची नजर लागली आणि  ते धरण बांधण्यास 1978 मध्ये सुरवात झाली.  बरोबर बिबी आणि कडधे  या ठिकाणी धरण बांधण्यास घेतले .
  या धरणाचं बांधकाम 1991 मध्ये झाले ,या धरणाने वाडा, कोयाळी, कहू,बिबी, तिफनवाडी ,माझगाव या गावांचा बळी घेतला.कित्येक लोकांची बसलेली घडी क्षणात विस्कटली. वडिलोपार्जित जमीन या धरणाने खाल्ली . 1992 मध्ये वाडा गावातील अनेक मंदिरे,शाळा,जलमय झाली ,हे सांगत असताना शंकररावांनी डोळ्यातून अनेक अश्रूंना आमंत्रण दिले होते. वयाचे 80 वे वर्ष पूर्ण करत असताना नकळत आपल्या धोतराच्या पदराने डोळे पुसून काही क्षण सूरज पासून  ते दूर झाले होते.
  (शब्दांकन- बाळासाहेब मेदगे,औदर 9004564645)

error: Content is protected !!