वडगाव व देहू नगरपंचायतींना अग्निशमन केंद्र उभारणीसाठी २ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध
वडगाव मावळ :
मावळ विधानसभा मतदार संघातील नव्याने स्थापन झालेल्या वडगाव मावळ व  श्री क्षेत्र देहू या दोन्ही नगरपंचायतींना अग्निशमन केंद्र उभारणीसाठी व अग्निशमन वाहनांकरिता सुमारे २ कोटी ५६ लाख ६९ हजार रुपयांचा निधी आमदार सुनिल शेळके यांनी महाराष्ट्र अग्निसुरक्षा योजनेतर्गत उपलब्ध करून दिला आहे.
मावळ विधानसभा मतदार संघातील वडगाव मावळ व श्री क्षेत्र देहू या दोन्ही ठिकाणी वाढत्या शहरीकरणाच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सुसज्ज अग्निशमन यंत्रणा आवश्यक असल्याने आमदार सुनिल शेळके यांनी शासनाकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र अग्निसुरक्षा योजनेंतर्गत वडगाव मावळ नगरपंचायतीस १ कोटी २७ लाख ८२ हजार रुपये तर श्री क्षेत्र देहू नगरपंचायतीस १ कोटी २८ लाख ८७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून वडगाव मावळ व श्री क्षेत्र देहू येथे अग्निशमन केंद्र इमारतीची उभारणी व अग्निशमन वाहने घेण्यात येणार आहेत.
पूर्वी वडगाव मावळ व श्री क्षेत्र देहू याठिकाणी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याने या शहरांमध्ये कोठेही आग लागण्यासारख्या आपत्कालीन घटना घडल्यास येथील प्रशासनास तळेगाव दाभाडे नगरपरिषद व पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथून मदत घ्यावी लागत होती. यामुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेत मदत मिळत नव्हती. पुढील काळात वडगाव व देहू या दोन्ही शहरात अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार असल्याने दोन्ही शहरे सुरक्षित होणार आहेत.

error: Content is protected !!