वडगाव मावळ:
सततच्या खंडीत वीजपुरवठ्यामुळे वडगाव शहरातील काही भागांत होणारा विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण विभागाने याठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळाची उपलब्धता करावी अशी मागणी नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी केली.
वारंवार होणा-या खंडीत वीजपुरवठ्यामुळे वडगाव शहरातील काही ठिकाणी होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे वडगावकर नागरिक हैराण झाले असून विद्युतपुरवठा सुरळीत करण्याबाबतचे पत्र वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे यांनी वडगाव येथील विद्युत महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना दिले.
वडगाव शहरातील काही भागाला पाणीपुरवठा करणा-या जांभूळ बंधा-यावरील खंडित होणारा विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यात यावा अशी मागणी केली.
यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजित वाघमारे, दिलीप म्हाळसकर, प्रविण चव्हाण, राजेश बाफणा, विशाल वहिले, संदीप ढोरे आदि उपस्थित होते.
मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत कार्यक्षेत्रात सुमारे ३५ ते ४० हजार लोकसंख्या आहे. तसेच शहरात सांगवी, जांभूळ, कातवी अशा तीन पाणी योजना कार्यान्वित आहे. त्यापैकी जांभूळ पाणी पुरवठा योजना हि वडगाव नजीक असलेल्या जांभूळ गावाच्या हद्दीत बंधारा असलेल्या ठिकाणाहून वडगाव शहरातील काही भागांत पाणी पुरवले जाते.
परंतु गेल्या दीड महिन्यांपासून सततच्या खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे महावितरण विभागाने लवकरात लवकर कारवाई करून याठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळाची उपलब्धता करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!