उपमुख्यमंत्री फडणवीस यांना माजीमंत्री भेगडे भेटले अन् `पीएमआरडीएच्या ‘आयुक्तांची बदली झाली
वडगाव मावळ :
  माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून पीएमआरडीएकडून प्रसिद्ध  करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यात गैरव्यवहार झाला असल्याचे निवेदन दिले आहे.भेगडे यांच्या या मागणीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांची बदली झाली. त्यांच्या जागी आर.आर. महिवाल या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिवसेंना नियुक्तीचे ठिकाण दाखविण्यात आलेले नाही.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच २ तारखेला राजपत्रात प्रसिद्ध झालेला हा पीएमआरडीएचा आराखडा तयार करताना मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्यता भेगडे यांनी वर्तवली आहे. तसेच तो बिल्डरधार्जिणा आणि शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आहे, असा घणाघातही त्यांनी केला आहे.
या चुकीच्या आराखड्याविरोधात त्यांनी पुणे जिल्हा दौरा करून त्याविरोधात जागृती करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यात रिंगरोड, रस्ता, रेल्वे आदींचा समावेश असून त्यासाठी चुकीची आरक्षणे टाकण्यात आली असल्याचा दावा केला गेला आहे. म्हणून त्याविरोधात जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आंदोलनही केली आहेत. त्यासाठी त्यांना व स्थानिक रहिवासी व ग्रामपंचायतींना विश्वासात घेण्यात आले नाही,असे त्यांचे व भेगडेंचेही म्हणणे आहे. तसेच तो तयार करताना प्रत्यक्ष पाहणी न करता ती जीपीएस आणि सॅटेलाईटव्दारे केली गेली. परिणामी तो सुस्पष्ट झाला नाही. परिणामी स्थानिक व शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांत असंतोष निर्माण करणारा हा आराखडा रद्द करा, अशी मागणी भेगडेंनी केली आहे.

error: Content is protected !!