पी एम आर डी कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यात गैरव्यवहार :माजी मंत्री बाळा भेगडे 
वडगाव मावळ:
पीएमआरडीएकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्यात गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता जी.पी.एस आणि सॅटेलाईटद्वारे पाहणी करून आराखडा बनविला आहे. सदर प्रारूप आराखडा बिल्डर धार्जीण असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आहे. त्यामुळे हा आराखडा रद्द करण्यात यावा, अशी मागणी मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
भेगडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचेकडून दि.०२/०८/२०२१ रोजी क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आला. सदर प्रारूप आराखड्यामध्ये प्रस्तावित आरक्षण, झोन, गाव रस्त्यांचा विस्तार, रिंगरोड, रेल्वे आदिंचा समावेश करण्यात आला होता.
सदरच्या प्रारूप विकास आराखडा तयार होत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता जी.पी.एस आणि सॅटेलाईट द्वारे पाहणी करून आराखडा बनविण्यात आला. तसेच त्याठिकाणच्या स्थानिक शेतकरी, ग्रामपंचायती व नागरीकांना विश्वासात न घेता तयार करण्यात आलेल्या आराखड्यामध्ये सुस्पष्टता नसल्याने शेतकरी व नागरीकांच्या मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे.
शेतकरी व नागरीक यांचे मत विचारात न घेता तयार करण्यात आलेल्या आराखड्यामध्ये रस्ते, रेल्वे, प्रस्तावित आरक्षण यांचे चुकीच्या पद्धतीने नियोजन केले गेले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकरी व नागरीकांच्या वतीने सदर आराखड्या विरोधात आंदोलने करण्यात आलेली होती. पुणे जिल्हा परिषदेकडून गावठाण विस्तारीकरणा बाबत ठराव तयार करण्यात आलेला होता परंतु याबाबतही कोणतीही कार्यवाही सदर आराखड्यामध्ये झालेली नाही.
हा प्रारूप विकास आराखडा तयार होत असताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता आहे. तसेच सदर प्रारूप आराखडा बिल्डर धार्जीण असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आहे. त्यामुळे या विकास आराखड्या बाबत सर्व सामान्य नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात असतोष निर्माण झालेला आहे. तरी सदर दि.०२/०८/२०२१ रोजी प्रसिद्ध झालेला प्रारूप विकास आराखडा रद्द करण्यात यावा असे बाळा भेगडे यांनी उपमुख्यत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

error: Content is protected !!