गावपातळीवरील विकासाची दूरदृष्टी असलेला सहकारी हरपला: सरपंच नामदेवराव शेलार
मावळमित्र न्यूज विशेष:
गाव पातळीवरील विकासाचे स्वप्न घेणारे माझे मित्र कै.श्री. सुदामराव यशवंत वाडेकर अनंतात विलीन झाले. १९९५ साली डाहुली ग्रुप ग्रामपंचायतींच्या सरपंच पदावर विराजमान झालेल्या या सहकारी मित्राने स्व.दिलीपभाऊ टाटिया यांच्या मार्गर्शनाखाली आंदर मावळ सरपंच संघटनेची स्थापना केली.
आंदर मावळातील पन्नासहून अधिक गावांना सामूहिक विकासाची दिशा देण्याची भूमिका घेणारी ही सरपंच संघटना आम्ही मंडळींनी जवळून पाहिली.
लालमातीचे रस्ते,पिण्याच्या पाण्यासाठी माता भगिनींची होणारी पायपीट,शिक्षण आणि आरोग्याच्या  असुविधा असा काहीसा दुर्लक्षित असलेला आंदर मावळ. या भागातील गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींना ‘सरपंच संघटनेचे पहिले व्यासपीठ मिळवून देणा-या समकालीन सरपंच,उपसरपंच मंडळीची काही नावे सहज डोळ्या समोरून गेली. या सरपंच मंडळीच्या मांदियाळीत कै.श्री. सुदामराव वाडेकर यांचा आणि माझा विशेष लोभ होता.
एकतर आम्ही समवयस्क,दुसरे हा लोभ असण्यास त्याला नात्यागोत्याची जोड. तिसरे आमची निखळ मैत्री आणि चौथी बाब आमच्यातील सुविचारांचा धागा यामुळे कै.सुदामराव आणि माझ्यात विशेष सख्य होते. कै.सुदामराव पंचतत्वात विलीन झाले. आणि नकळत  त्यांच्या आठवणींचा गतकाळ डोळ्या समोरून गेला. कै.सुदामराव वडगाव मावळाला राहून पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात नोकरी करायचे. मीही कान्हे राहून पिंपरीत नोकरी करायचो. आमच्या दोघांतील मैत्री अगदी पारदर्शक होती.
१९९५ साली ग्रामपंचायत निवडणूकीची बिगुल वाजले. सुदामराव कान्हे येथे घरी भेटले आणि मला निवडणूकीत मदत करा असे सुचविले. सरपंच पदासाठी सहकार्य केले तर नक्कीच विकासात्मक कामांना प्राधान्य देईन असा विश्वास त्यांनी दिला. आणि १९९५ च्या निवडणुकीत आम्ही सगळी मंडळी सुदामराव सोबत राहून त्यांच्या गळ्यात सरपंच पदाची टाकली. त्यांनीही सरपंच पदाला न्याय देत संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकासात्मक कामे केली. कांब्रे पठारा सारख्या दुर्गम भागात जिल्हा परिषदेची शाळा बांधली ती सुदामराव यांनी.हे एक कामाचे उदाहरण झाले अशी अनेक कामे आहेत.
ज्या कामामुळे गावच्या विकासाला हातभार लागला. धर्मनिरपेक्ष विचारांवर सुदामराव यांचे अधिष्ठान होते.
त्यामुळे अनेक नेत्यांशी त्यांची मैत्री होती,त्यांच्या मैत्रीचे अनेक धागे आजही तसेच जपून आहे.पक्षविरहित मंडळीशी त्यांचा स्नेह होता. शैक्षणिक कामाला त्यांनी अधिक प्राधान्य दिले.
सरपंच पदा बरोबर आंदर मावळ व्यावसायिक सहकारी दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.भैरवनाथ माध्यमिक विद्यालय शाळा समितीचे अध्यक्ष पद हे त्यांनी भूषविले.
राजकारणात दूरदृष्टी असलेल्या मित्राचा कौटुंबिक दरारा ही मोठा होता. कुटूबियांतील मंडळी  फार  आदराने त्यांच्या शब्दाला मान देत.मग तो शब्द कौटुंबिक हिताचा असो,अथवा जनहिताचा. कै.सुदामराव वाडेकर यांचा शब्द हा शेवटचा शब्द,असो कितीही भावना व्यक्त केल्या तरी त्या कमीच पडतील.गावपातळीवरील विकासाची दूरदृष्टी असलेला सहकारी हरपला हे शल्य मनात कायम राहील.
(शब्दांकन-श्री.नामदेव नानाभाऊ शेलार,सरपंच ग्रुप ग्रामपंचायत डाहुली)

error: Content is protected !!