मावळमित्र न्यूज विशेष:
आदर्श शिक्षक..स्पष्ट वक्ता.. कुशल संघटक…सुस्वभावी कार्यकर्ता.. कर्तबगार व्यक्तीमत्व..अशा एक ना  अनेक उपाधी ज्यांच्यावर शोभून दिसतात.किंबहुना अशी उज्वल प्रतिमा कमावलेले धनवे सर आज सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्त हा शब्द फक्त वय झाले म्हणून त्यांच्या नावामागे लिहिला जाईल. अन्यथा विद्यार्थी, पालक,शिक्षक आणि शिक्षक संघटनेत आपले धनवे सर हे आपलेपणाचे नाते अगदी घट्ट चिकटून आहे.
श्री. चंद्रकांत गुंडेराव धनवे
प्राचार्य – प्रगती विद्या मंदिर व
ह.भ.प. आ.ना.काशिद(पा) ज्युनिअर कॉलेज, इंदोरी ज्युनिअर कॉलेज, इंदोरी असे आपले पणाचे नाते जपत ज्ञानदान करणा-या शिक्षकांचे नाव.
श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने पावन झालेल्या अक्कलकोट नगरीपासून अवघ्या चार मैलावर असणाऱ्या ‘दहिटणे’ या गावी माता ‘अंबुबाई’ व पिता ‘गुंडेराव गणपतराव धनवे’ या शेतकरी दांपत्यांच्या पोटी चंद्रकांत धनवे सरांचा जन्म झाला. गरीब शेतकरी कुटूंबात २० जुलै १९६४ रोजी जन्मलेल्या या शेतकरी पुत्राने आयुष्यभर ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. ज्ञानदान देऊन कित्येक विद्यार्थी घडवले. जे आज समाजात मानाने मिरवत आहे.
नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने ज्येष्ठ बंधू यांचे वास्तव्य पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यातील तळेगाव शहरात होते.त्यामुळे धनवे सर यांचे प्राथमिक शिक्षण येथील  नथुभाऊ भेगडे या शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण सांगलीला गावीच ‘ज्ञानगंगा प्रशाला’ या विद्यालयात पुर्ण झाले.
‘गुरूने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा’ या प्रमाणेच माध्यमिक शिक्षण घेत असताना मनावर कुलकर्णी सरांच्या इंग्रजी विषय शिकवण्याचा पगडा होता. हा पगडा इतका घट्ट होता की, पुढे ‘अध्यापक महाविद्यालय अरण्येश्वर येथे शिक्षणशास्त्र पदविका येथे संपादन करुन सरांनी इंग्रजी विषयाचे तज्ञ अध्यापक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र शिक्षणक्षेत्रात प्रवेश केला.
त्यांनी अध्यापन सेवेचा श्री गणेशा दि. २४ सप्टेंबर १९९२ साली नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पवना विद्या मंदिर, पवनानगर या ठिकाणी केला. पवनमावळातील पवना खोऱ्यात दोन तप ज्ञानदानाचे काम केले. विशिष्ट अध्यापन शैलीमुळे आपल्या नावाला एक वेगळेच वलय प्राप्त झाले त्यानंतर मागील सहा वर्षापूर्वी जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि भंडारा डोगराच्या पायथ्याशी असलेल्या इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिर या ठिकाणी कार्यरत राहून आज आपण प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त होत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तबद्ध विचारांचे नेहमीच आकर्षण राहिले आहे त्यामुळे आपण शिस्तबद्ध, प्रामाणिक, जीवन जगत आहात याचा आम्हा सर्व शिक्षकांना आपला सार्थ अभिमान वाटतो. त्याचबरोबर कुटूंबवत्सल आहात. आपल्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती संगीता या देखील सांगली जिल्हयातील कुपवाड या गावी ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. तर कन्या कु. गायत्री हिने बी.टेक. महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आपला चिरंजीव विराज हा देखील महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. कुटूंबाविषयी असणारा जिव्हाळा व सलोखा अनेकांना शाळेतही अनुभवायला मिळत आहे.
शिक्षणक्षेत्रात कार्य करत असताना मला अनेक संमित्र भेटले यामध्ये साते गावचे माजी  आदर्श सरपंच व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे तालुक्याचे अध्यक्ष भाऊसाहेब आगळमे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले पाहीजे.
धनवे सरांच्या प्रत्येक निर्णायात आगळमे सर खंबीरपणे साथ देणारे आणि माझ्या सुखादुखात कायम माझ्यासोबत एक बंधु, सखा माझी पाठीराखा म्हणुन कायमच उभे राहीले. त्याचप्रमाणे मित्र हीच संपत्ती समजुन आणि माणसे कमवाण्याची कला असल्याने माझ्या ३० वर्षाच्या सेवाकालात अनेक मित्र कमावले, माजी मुख्याध्यापक दगडु शेवकर सर, पटवर्धन सर, श्रीमती विद्या गांधी, सिमा गावडे, दशरथ ढमढेरे, काशिनाथ निंबळे,बबन ताबे,प्रिती जंगले, महादेव थोरात,सतीश जाधव, बलभीम भालेराव पांडुरंग ठाकर, अंजली दौंडे, धनंजय खाडे,भारत काळे, राम कदमबांडे, समीर गाडे, विनोद भोसले, मच्छिंद्र बारावकर,सौ.वैजंयती कुल,सौ.मोहीनी ढोरे यांनी विशेष सहकार्य केले तर हयात नसलेले स्वर्गीय भारत गांधी, जनार्दन माळी, मच्छिंद्र कांबळे यांची नावे आदराने घ्यावी लागतील.या सर्वाच्या  मार्गदर्शन व पाठींब्यामुळे मी या क्षेत्रात काम करीत राहीलो,असे धनवे सर आवर्जून सांगतात.
शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना धनवे सरांच्या कार्याची दखल घेत  विविध  समाजिक व सेवाभावी संस्थानी पुरस्कार देवून सन्मानित केले आहे . सन २०१४ साली मावळ तालुका पंचायत समितीने गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. साई सेवाधाम कान्हे फाटा येथे गुरुपोर्णिमेनिमित्त त्यांना गौरविण्यात आले आहे. पवनानगर या ठिकाणी केलेल्या सेवेबद्दल आपली १९९७ च्या बॅचच्यावतीने माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान केला आहे.
शिक्षक हा समाजशील प्राणी आहे या भावनेनेच ते  सदैव कार्यरत राहिलेत.
शिक्षण हे गोर गरिबांपर्यंत पोहचले पाहिजे. या तत्वाशी बांधिलकी ठेवून कायम आचरण केले. सत्कर्मावर प्रचंड विश्वास असलेल्या धनवे सरांनी आपल्या आचार विचारांना मूल्यांची स्वतंत्र बैठक आहे. स्पष्ट वक्तेपणा, खोलवर विचार करण्याची पद्धत ही त्यांची  स्वभाव वैशिष्टये आहे. या ३० वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक विद्यार्थी घडविण्याचे काम केले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात स्थिरस्थावर आहेत. तर अनेक जण सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपले नाव कमवत आहेत, याचे श्रेय अर्थातच धनवे सरांना.
आज आपल्या सर्वाच्या उपस्थित त्यांचा सेवानिवृत्त सोहळा संपन्न होत आहे.आयुष्याची पुढची इनिंग आज सुरू होत आहे. या इनिंग मध्ये आपणांस उत्तम आयुरारोग्य लाभो, आपलेपण जपत आपण अधिक आनंदात वावरून आपल्या पायीशी सर्व सुख लोळण घेवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करून शब्दांना पूर्णविराम देतो.
(शब्दांकन- भारत काळे, शिक्षक पवना विद्यालय,पवनानगर)

error: Content is protected !!