निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या मावळ तालुक्याची पर्यटकांना भुरळ
सह्याद्रीच्या कुशीत फेसाळत वाहणा-या धबधब्यांचे आकर्षण
मावळमित्र न्यूज विशेष:
निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या मावळ तालुक्यात वर्षाविहाराला लाखोंच्या संख्येने पर्यटक येत आहे. मावळातील लोणावळा खंडाळा ही हिल स्टेशन जगाच्या नकाशावर आहे. जगभरातील पर्यटक बाराही महिने लोणावळा खंडाळयात हजेरी लावून पर्यटनाचा आनंद लुटत आहे.
या परिसरातील कार्ला आणि भाजे गावच्या लेण्या,लोहगड विसापूर,राजमाची चा किल्ला पर्यटकांच्या नजरेत भरतो.पवन मावळातील बेडसेची लेणी,तिकोणा,तुंगचा किल्ला ही पर्यटकांचे आकर्षण आहे. मावळ तालुक्यातील सह्याद्रीला फुटलेला पान्हा डोळ्यात साठवून ठेवायला हजारो पावले मावळात रोज पडत आहे.
येथील पवना,आंद्रा,इंद्रायणी,कुंडलिका नद्याचे वाहते पाणी पाहिले की,मनाला प्रसन्न वाटते. पवना,शिरोता,ठोकळवाडी,जाधववाडी,वाडिवळे,कासारसाई धरणाच्या तीरावर उभे राहून विस्तारलेल्या जलाशयाकडे कित्येक वेळ नजर लावून मनातील गुजगोष्टी या बोलता येतात. मावळ तालुक्याला ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारसा लाभला आहे,हे आपण जाणतो आहोतच. मावळ तालुक्याच्या निसर्गाची भुरळ पडलेल्या पर्यटकांचे मावळात स्वागत केले जाते. ती मावळाची रीत आणि परंपरा ही आहे.
पण मावळात येताना आणि जाताना वाहन चालकांनी विशेष खबरदारी घ्यायला हवी.
वाहने चालवताना वाहतुकीच्या नियमाचे आणि वेगाचे बंधन पाळले पाहिजे. अरूंद  आणि वळणदार रस्ते असल्याने विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यात पावसामुळे रस्ते निसरडे तर झाले आहे,ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.मावळात येऊन काय पाहणार असा प्रश्न पडला असेल तर,मावळात लोणावळा,खंडाळा तर पहाच. पण या शिवाय संपूर्ण आंदर मावळ,संपूर्ण नाणे मावळ आणि संपूर्ण पवन मावळ नक्की पहा.
या ग्रामीण भागातील रस्त्यावरून जाताना सह्याद्री पाहताना नवी उमेद आणि उर्जा मिळेल. सह्याद्रीच्या डोंगरावरून फेसाळत वाहणारे धबधबे नजरेत भरले की,त्या खाली भिजण्याचा मोह टाळता येणार नाही. रिमझिम बरसणा-या पावसाच्या झरा झेलीत,धुके अंगावर घेत सुरू झालेला प्रवास कित्येक किलोमीटर पुढे गेला तरी कंटाळवाणा येणार नाही. सोबत येताना न्याहारी आणि पाण्याची बाटली सोबत नाही घेतली तरी चालले.
अस्सल मावळातील इंद्रायणी तांदळाचा भात,वरण,भाकरी,ठेचा,भाजी असे शुद्ध शाकाहारी जेवणही मिळेल. आणि झणझणीत चिकन आणि मटणाचा रस्सा असलेले मांसाहारी जेवणही मिळेल. वडापाव,चहा,मिसळची चवही आपल्याला चाखता येईल. लोणावळा, खंडाळा ,राजमाची,कार्ला,भाजे,लोहगड,विसापूर,तुंग,तिकोणा हे नक्की पहा.
या शिवाय कामशेत नाणे  वरून जांभवलीच्या कोंडेश्वर मंदीरात जरूर दर्शनाला जा. रयतेचे राजे छत्रपती शिवाजीमहाराज यांनीही या मंदिरात महादेवाच्या चरणी हात जोडून स्वराज्यासाठी बळ मागितले. सह्याद्रीच्या कोंदणातील या मंदिराचे सौंदर्य पावसाळ्यात अधिक बहरते याचा अनुभव आपल्याला घेता येईल. कान्हे फाटा टाकवे बुद्रुक वडेश्वर मार्गे खांडीला जाऊन सावळा गावातून किवळे मार्गे परत या. परदेशातील अनेक सुंदर पर्यटनस्थळे फिरल्याचा फील येईल.जाताना सहकुटुंब सहपरीवार पर्यटनाचा आनंद लुटा येईल असा हा सगळा परिसर आहे. अनेक धबधबे पाहत पाहत गेले तरी वनडे ट्रीप मस्त होईल.
पवनानगर परिसरातील पवना धरणाला वेढा दिल्या शिवाय या भागातील निसर्ग अनुभवता येणार नाही. पवनानगर,शिळींब,मोरवे सह दूधिवरे,आंबेगाव,शिंदगाव पाहता येईल. वाघेश्वर गावाला आवर्जून भेट द्या. मावळ इतकाच नाही,नवलाखउंब्रेतील श्रीराम मंदीर,कुंडमळा,शिरगाव  अशी अनेक गावे आणि वाड्या वस्त्यांवर जाऊन मावळ न्याहाळता येईल आणि पाहता येईल. मावळ तालुक्याचे पावसाळी वैभव अनुभवले तर वर्षभराचा ट्रेस कुठल्या कुठे पळून जाईल.

error: Content is protected !!