वडगाव मावळ:
मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसात  अतिवृष्टी मुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर शनिवारी म्हणजेच (दि. १६) रोजी करंजगाव पठार येथे अतिवृष्टीमुळे पशुपालक बापू ठिकडे यांच्या १५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यातील काही जनावरे डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याबरोबर वाहून गेली आहेत.
यातील १० जनावरांचा पंचनामा शासनाकडून करण्यात आला आहे तर उर्वरित जनावरे डोंगरातून अद्याप सापडली नाहीत. यामध्ये पशुपालकाचे सुमारे १० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान,मंडळ अधिकारी सुरेश जगताप, तलाठी दिलीप राठोड डॉ. सतीश भोसले, तलाठी रमेश कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. यावेळी करंजगावचे उपसरपंच नवनाथ ठाकर उपस्थित होते. शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न करत करण्यात येईल, असे करंजगावच्या सरपंच दीपाली साबळे यांनी सांगितले.
नाणे पठारावरही दुर्घटना – नाणे पठारावरील बाबू विठोबा शेडगे या पशुपालकाच्या तीन गाई अतिवृष्टीमुळे दगावल्या आहेत. नाणेचे तलाठी भाऊसाहेब रमेश कोल्हे म्हणाले, पंचनामा केला आहे. जास्तीत जास्त व कमीतकमी वेळेत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे.
डॉ. सतीश भोसले (पशुवैद्यक अधिकारी कामशेत) म्हणाले,”
शासनाच्या मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच व डॉक्टर यांच्या उपस्थित दहा जनावरांचा पंचनामा केला आहे. शासनाच्या माध्यमातून मोठ्या जनावरांना तीस व लहान जनावरांना पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई मिळत असते.ही रक्कम पशुपालकाला मिळवून देण्यासाठी सर्वच अधिकारी प्रयत्नशील आहेत.

error: Content is protected !!