साई :
शिरोता वन विभागाच्या साई गावच्या हद्दीतील वनक्षेत्रात कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचवून एका भेकराच्या पिल्लाला आदिवासी तरूणांनी जीवदान दिले आहे.या वन्यप्राण्याचा जीव वाचवल्याने या तरूणांसह संपूर्ण आदिवासी बांधवाचे सर्वजण भरभरून कौतुक करीत आहेत.
दोन दिवसापूर्वी सकाळच्या पाहरी भेकर मादी व तिच्या पिल्लावर काही कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांच्या हल्ल्यात मादी जंगलाच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी ठरली.पण तिचे पिल्लू एका दगडाच्या आडोशाला लपून बसले. याच वेळी रानभाजी आणण्यासाठी जंगलात गेलेल्या नवनाथ हिलम व रोहिदास हिलम या आदिवासी तरुणांनी हे पिल्लू पाहिले. पिल्लू खूप लहान असल्याने एकटं त्यास जंगलात सोडून देणे अशक्य होते.
त्यामुळे या तरुणांनी त्यास घरी आणून ठेवले. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या भेकराच्या पिल्लाला त्यांनी मायेची उब दिली. तसेच दूध विकत आणून बाटलीने पाजले. नवनाथ हिलम ह्या तरुणाने वन्यजीवरक्षक संस्थेचे सदस्य सचिन वाडेकर व उमेश धुमाळ यांना ह्या पिल्लाबाबत माहिती दिली व कात्रज येथील प्राणीसंग्रहालयात सोडा असं स्वतःहुन सांगितले. वन्यजीवरक्षक टीमच्या सदस्यांनी याबाबत माहिती वनविभागाला दिली.
मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण, उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली, सहायक वनसंरक्षक मयुर बोठे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या आई पासून हरवून रस्ता चुकूलेले ते भेकराचे पिल्लू वनविभाग व वन्यजीव रक्षक संस्था मावळ यांनी संयुक्तपणे रेस्क्यू केले. वडगाव येथील वनविभागाच्या कार्यालयात वनपरीक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार, वनपाल मंजुषा घुगे, वनरक्षक गणू गायवाड, शंकर घुले तसेच प्राणीमित्र जिगर सोळंकी यांनी त्या पिल्लाची शारीरिक तपासणी करून त्यास पुढे पुणे येथील रेस्कयू चारिटेबल संस्थेत पाठवले आहे.
भेकराचं पिल्लू एकदम ठणठणीत असून लवकरच त्यास त्याच्या अधिवासात सोडण्यात येईल असं वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावर यांनी सांगितलं.
कातकरी आदिवासी लोक हे मुळात मासेमारी, मोलमजुरी करणारी जातं. पूर्वी ही जात शिकार करत असत. पूर्वी ह्या लोकांकडून होत असलेल्या शिकारी सध्या बंद झाल्या आहेत. आणि आता सर्वसामान्य लोक शिकारी करु लागले आहेत. भेकराच्या पिल्लाला वाचविल्याबद्दल ह्या आदिवासी तरुणांच्या खांद्यावर कौतुकाची थाप पडत आहेत.

error: Content is protected !!