वडगाव मावळ:
मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे २७२ शाळांमधील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व अधिकाऱ्यांसमवेत आमदार सुनिल शेळके यांनी आढावा बैठक घेऊन संवाद साधला.
आमदार शेळके यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी यांच्याशी  संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शाळेची गुणवत्ता व पटसंख्या वाढली पाहिजे यासाठी अध्यक्ष, समिती, शिक्षक, अधिकारी यांनी अधिक प्रयत्न केले पाहिजे.त्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करणे गरजेचे आहे.म्हणून समन्वयातून मार्ग काढून त्यावर उपाययोजना करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.
  अनेक शाळांच्या इमारतींमधील जीर्ण झालेल्या वर्ग खोल्यांची दुरुस्ती करणे, आवश्यक तेथे नव्याने वर्ग खोल्या बांधणे, शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, मुख्य रस्त्याजवळ असलेल्या शाळांना संरक्षक भिंत नसल्याने विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो, त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे.शाळांमध्ये स्वच्छतागृह उपलब्ध नाही त्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधणे,ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शाळेच्या वेळेवर एस.टी. उपलब्ध करणे,विद्यार्थ्यांना देण्यात येणारा शालेय पोषण आहार उत्कृष्ट दर्जाचा असणे, शाळेमध्ये रंगरंगोटी,आसन व्यवस्था, सर्व विद्यार्थ्यांना गणवेश अशा विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
   या सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर शाळांमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार निधी, CSR फंड अशा विविध माध्यमांतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करण्यात येईल,असे आश्वासन आमदार शेळके यांनी दिले.
गटविकास अधिकारी श्री.सुधीर भागवत, गटशिक्षण अधिकारी श्री.बाळासाहेब राक्षे, माजी नगरसेवक श्री.सुरेश दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका संघटक श्री.संजय बाविस्कर, वडगाव शहराध्यक्ष श्री.प्रवीण ढोरे, तसेच सर्व विभागाचे केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपस्थित होते.

error: Content is protected !!