एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू, तर तीन वारकरी जखमी
देहू :
वारीत सहभागी होण्यासाठी चाललेल्या वारकऱ्यांना कंटेनरची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून तीन वारकरी जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (दि. २०) दुपारी चार वाजता देहू आळंदी रस्त्यावरील तळवडेगावच्या हद्दीत कॅनबे चौकाजवळ घडला.
भगवान साहेबराव घुगे (वय ३०, रा. बुलढाणा) असे मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. बबन जायभाये (वय ५०), पूजाबाई साहेबराव घुगे (५२) भिकाजी बनसोडे (वय ५०) अशी जखमींची नावे आहेत. 
कंटेनर चालक जगन्नाथ भानुदास मुंडे (वय ४२, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भास्कर बाजीराव जायभाये (वय ४१, रा. बुलढाणा) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देहूगाव येथून जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे सोमवारी प्रस्थान ठेवले.
या पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी देहूनगरीत दाखल झाले आहेत. तळवडे येथील कॅनबे चौकाजवळ सोमवारी दुपारी एका कंटेनरने (एमएच १२ क्यू जी ५३३८) चार वारकऱ्यांना धडक दिली. या अपघातात भगवान यांचा जागीच मृत्यू झाला असून तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कंटेनर चालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

error: Content is protected !!