गोवित्री विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी रमेश रघुनाथ भुरुक बिनविरोध
वडगाव मावळ :
नाणे मावळातील गोवित्री विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष पदी रमेश रघुनाथ भुरुक व उपाध्यक्ष पदी नंदकुमार महादू जाधव यांची गुरुवारी (दि.९) वडगाव मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी गोवित्री विकास सोसायटीचे संचालक मधुकर जाधव, दगडाबाई ढोरे, पार्वतीबाई पवार, भाऊ सुतार, बाळासाहेब गायकवाड, बाळू शिंदे, भरत शेडगे, नथू गुरव, तुकाराम शेडगे, ज्ञानोबा पवार, तसेच नगराध्यक्ष मयूर ढोरे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे,वडगाव शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अतुल वायकर, भाऊसाहेब ढोरे, मोहित कदम आदि मान्यवर उपस्थित होते. या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी काम पाहिले.
मागील अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असलेल्या गोवित्री विकास सोसायटीची मागील महिन्यात निवडणूक लागली होती. या सोसायटीच्या १३ संचालकांच्या जागांसाठी सुमारे २४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले होते. मात्र नामनिर्देशन पत्रांच्या छाननी प्रक्रियेत भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाल्याने राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. यामुळे मावळातील राजकीय दृष्ट्या लक्षवेधी असलेल्या गोवित्री विकास सोसायटीवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आली आहे.

error: Content is protected !!