
मावळातील विकासकामांचे अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन: आमदार सुनील शेळके यांची माहिती
तळेगाव दाभाडे:
मावळ तालुक्यातील १८० कोटी ५७ लाख रुपयांच्या विविध मंजूर विकासकामांचे भूमिपूजन व शिलान्यास समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (ता.३ जून) ला होणार आहे. ४० कोटी रुपये खर्चाच्या तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीसह शहरविकासाच्या एकूण ६४ कोटी ६८ लाख ४९ हजार रुपयांच्या विविध मंजूर कामांचा समावेश आहे, आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राष्ट्रवादीचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, राजू खांडभोर, संजय बाविस्कर, सुहास गरूड, चंद्रकांत दाभाडे उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील विकासकामांच्या भूमिपूजन आणि शिलान्यासानिमित्त आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे.उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसेपाट कील, उद्योग व खनीकर्म राज्यमंत्री आदिती तटकरे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्ततनपुरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे, बाळा भेगडे यांच्यासह राजघराण्यातील माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे (सरकार), माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे (सरकार) आणि वृषालीराजे दाभाडे (सरकार) यांना विशेष निमंत्रित करण्यात आल्याचे गणेश खांडगे यांनी सांगितले.
आमदार शेळके म्हणाले,” १८० कोटी ५७ लाख पाच हजार रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी तळेगाव दाभाडे शहरासाठी ६४ कोटी ६८ लाख ४९ हजार रुपये, कार्ला, शिरदे, मंगरूळ आणि वडीवळे या पुलांसह रस्ते सुधारणेसाठी ८१ कोटी ७४ लाख ५६ हजार, शासकीय आश्रमशाळा वडेशर इमारतीसाठी १० कोटी ७५ लाख, मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेतंर्गत शेत पानंद रस्त्यांसाठी १३ कोटी २० लाख, तर ७ मंडल अधिकारी व ४३ तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी १० कोटी १९ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
तळेगाव दाभाडे शहरात बेटी बचाओ, बेटी पढाओ या ३० लाख ७७ हजार रुपये खर्चाच्या शिल्पाचे काम पूर्ण झाले असून, राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन याच दिवशी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देहूरोड येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार असून, सोमाटणे येथे रॅली तसेच जिजामाता चौकापासून कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत मिरवणूक निघणार आहे.
त्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर मेळावा होणार असून तालुक्यातील दहा ते बारा हजार कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून,जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




