धरण उशाला कोरड घशाला : पठारावरील नागरिकांची पाण्यासाठी वणवण
वडेश्वर:
मावळ तालुक्यातील आंदर मावळ व नाणे मावळ
भागाच्या सीमावर्ती असलेल्या सह्याद्रीच्या पठारावरील नाणे पठार, करंजगाव पठार, डोंगरवाडी, धनगरवाडी, सटवाईवाडी, उकसान- पाले पठार, कुसूर पठार, कांब्रे पठार या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी व धनगर बांधवांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. स्वातंत्र्यकाळ उलटूनही कित्येक वर्षे झालीत मात्र येथील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
आंदर मावळमध्ये ठोकळवाडी धरण,आंद्रा धरण, वडिवळे धरण असून या आदिवासी धनगर बांधवांना पाण्याची सोय उपलब्ध झालेली नाही. धरण उशाला आणि कोरड घशाला. अशी परिस्थिती येथील नागरिकांची झाली आहे. येथे असलेल्या विहिरीच्या पाण्याची पातळी खालावल्याने त्यामध्ये फक्त गाळ शिल्लक आहे. त्यातच गेल्या सात ते आठ वर्षापासून विहिरीतील गाळ काढला गेला नसल्याने येथील पाणी दूषित होऊन बेचव झाले आहे. त्यामुळे वाड्या – वस्त्यावरती आजाराचे प्रमाण ही वाढले आहे.
येथील पठारावर नैसर्गिक स्रोत आहेत. मात्र उन्हाच्या तडख्याने ते आटले आहेत.परिणामी थोड्या प्रमाणात शिल्लक असलेले पाणी भरण्यासाठी ताटकळत थांबावे लागत आहे. दरम्यान पाणी वाहण्यासाठी येथील नागरिकांना व महिलांना कामधंदे सोडून तासनतास वाया घालवावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी येथील नागरिकांना जीवाची ओढतोड करावी लागत आहे.
दरम्यान पाणी काढण्यासाठी या भागात कसलीही यंत्रणा नसल्याने नागरिकांना व जनावरांना पाणी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी हा जीव घेणा प्रवास कधी थांबेल असा येथील नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत. प्रशासनाने, सामाजिक संस्थांनी, लोकप्रतिनिधिंनी या आदिवासी व धनगर बांधवांच्या समस्येकडे गंभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
मंगेश आखाडे, स्थानिक रहिवाशी, पाले पठार म्हणाले,”
दुर्गम भागात उकसान व पाले पठार येथील आखाडे वस्तीत पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सध्या मे महिना असल्यामुळे येथील लोकांच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विहिरीच्या कठड्यावर उभे राहून पाणी काढावे लागत आहे. विहिरीला संरक्षण कठडे व पाणी काढण्याची सोय नसल्यामुळे विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घडल्या आहेत. वस्तीवरील 40 ते 50 जनावरांना पाणी काढणे एक दोन माणसांना शक्य होत नाही. या पाण्याची व विहिरींच्या पाणी काढण्याचे उपाय योजना बाबत ग्रामपंचायत व प्रशासनाला तक्रार करून यावर लक्ष दिले जात नाही.

error: Content is protected !!