

माझा गाव माझी माणसं
मावळमित्र न्यूज विशेष:
माझ्या गावाचे नाव गडद, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या वास्तव्याने पावन झालेला असा माझा तालुका राजगुरूनगर (खेड) जिल्हा पुणे यात आहे. तालुक्याच्या पश्चिम भागांत सह्याद्रीच्या कुशीत तासुबाई डोंगराच्या पायथ्याशी गाव वसला आहे. सह्याद्री पर्वता मुळे गावचा आणि डोंगराचा संबंध खुप जुना आहे.
एखाद्या आईने आपल्या बाळाला आपल्या कुशीत घ्यावे तसा डोंगर गावच्या पाठिशी उभा आहे. एखाद्या भव्य तपस्वी पुरूषा सारखा याच डोंगरावर पुरातन अशी कोरीव लेणी आहे. यात दुर्गेश्वर मंदीर,पाण्याचे हौद,साधुबाबाचा मठ,कोरीव काम,अंधेरी खोली, या कोरीव लेण्या पर्यंत जाणारी वाट अत्यंत बिकट अशी आहे जरा जरी तोल गेला तर थेट डोंगराच्या कड्यावरून माणुस खाली पडुन मुत्यू पावेल अशी.
परंतु अजुन पर्यंत अपघाती घटना येथे घडलेली नाही. या लेण्याच्या खाली कपारीत शंभु महादेवाची पिंड आहे. या शंभु महादेवाच्या पिंडीवर डोंगराच्या काळ्या पत्थरातुन होणारा आश्चर्य कारक जलाभिषेक या मंदीराचे वैशीष्ठ आहे. या जलाभिषेका मुळे असे वाटते की सह्याद्री व निसर्ग ही भगवंता पुढे नतमस्तक झाले आहेत. याच डोंगराच्या पायथ्याशी आंबेराई आहे. मावळ खोऱ्यात काही गावांत देवराईचे जाणीव पुर्वक जतन केले जाते. तसेच गडदला देवराईचे जतन केले आहे. आणि ती ही आंबेराई आहे.
आंबेराईत झाडी येवढी दाट आहे की सुर्य किरण ही जमीनीवर पोचू शकत नाहीत.या देवराईत अनेक पशू-पक्षी यांचे वास्तव्य आहे. पण सर्वात लक्ष वेधून घेते ते शेकरू ( उडती खार),शेखरू हा खार कुळातील प्राणी आहे पण खारी पेक्षा याचा आकार बराच मोठा असतो. झुपकेदार शेपुट असते. शेकरू जेथे वास्तव्याला असते ते जंगल दाट जंगल मानले जाते.
जेमतेम हजार लोकवस्तीचा गाव सह्याद्रीच्या मुख्य रांगेत वसल्यामुळे निसर्ग सौंदर्याने समृध्द आहे. गावची जमीन सुपिक आहे. मुठभर दाणे पेरले तर गाडीभर पदरात पडतील अशी गाव टेकडीवर असल्यामुळे शेती शिवारावर आपल्या घराच्या दारात उभे राहीले की नजर आपोआप जाते. पावसाळयात शेती हिरवीगार दिसते. तसेच शिवार ही हिरवेगार असते.
गावच्या उजव्या व डाव्या बाजुने धबधबे डोंगर माथ्यावरून जमिनीकडे झेपावताना दिसतात.त्यांचे दुधाळपाणी हिरव्या रंगात लुप्त होऊन जाते. असे निसर्गाने गावाला भरपुर काही दिले आहे. अशा पावसाळयात श्रावण महीना येतो.श्रावण महीना म्हणजे धार्मिक महीना या महीन्यात घरोघरी हरी विजय, रामायण, पांडवप्रताप,शिवलीला अमृत नवनाथ कथासार अशा अनेक ग्रंथांचे वाचन केले जाते.माणसे दिवसभर शेतात राबतात व रात्री ग्रंथ ऐकण्यात व भगवंताच्या भजनात रमतात.
गावाला मोठी आंबेराई असल्यामुळे मे महीन्यात कै-या पिकण्याचा हंगाम असतो. त्या वेळी पंचक्रोशीतील माणसांची आंबेराईत पिकलेले आंबे खाण्याकरीता वर्दळ असते.या हंगामात संपुर्ण आंबेराईत आंब्यांचा सुगंध दरवळत असतो. अशा धुंद दिवसातच चैत्राच्या शेवटच्या सोमवारी महादेवाचा भंडारा आंबेराईत भरतो. दिवसभर देव दर्शन आणी भजनाचा कार्यक्रम देवाच्या पारावर चालतो.वयस्क मंडळी भजन ऐकतात तर तरूण मंडळी जेवण बनवण्यात दंग झालेली असतात. भजनाचा कार्यक्रम संपला की सायंकाळी आंबेराईत सामुहीक वन भोजन केले जाते.रात्र जागवण्यासाठी भारुडी भजन केले जाते.
मुठभर जोंधळे हातात घेउन कोंबड्या पुढे भिरकावावे त्या प्रमाणे इथली घरे भिरकावल्या सारखी वाटतात. पाच सहा घरे जवळ जवळ का ? एकादे दुसरे घर दुर फेकले का ? याला उत्तर एकच चार भिंतीच्या वरती लाल कौल व ऐखादी खिडकी असली की पुरे.घरांचे दरवाजे अभिजात नम्रता शिकवणारे वाकुन चाललो नाहीतर डोक्याला टेंगूळ हे ठरलेले.घरा समोर प्रशस्त आंगण आंगणात तुळस घरा मागे परस कोणालाही हेवा वाटावा असा घराचा परिसर अशी ही ठेंगनी मळकट घरे चुलीच्या धुरांने काळवंडलेली तरीही आजुबाजुच्या निसर्गाच्या पाश्वभुमीवर टुमदार,रेखीव चित्रकाराच्या कुंचल्याला आव्हान करणारी.
घरांचे दरवाजे जरी ठेंगणे असलेतरी घरांच्या आतिथ्याला मात्र बुटकेपणा अजुनही आलेला नाही.इथली आतिथ्याची उमेद कधी खुरटली नाही. काही नाही तरी गुळाचा खडा, भुईमुगाच्या शेंगा व पाणी कधी चुकले नाही.बुटक्या दरवाज्याच्या या घरातील हे आतिथ्य उंच आभाळाला लाजवु शकेल येवढे मोठे आहे.
इतिहासात याच माणसांनी आंधळी बादशाहीची सत्ता सर्व प्रथम ठोकरली.व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हर हर महादेव अशी गर्जना करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
इथली माणसे धार्मिक आणि कष्टाळू आहेत.आळस त्यांना फारसा माहीत नाही.कामाला लागली की वाघा सारखी काम करतील. तसेच उत्सव प्रिय सुध्दा आहेत.नागपंचमी,गौरी गणपती,दसरा-दिवाळी, पाडवा, होळी अक्षय तृतीया हे सण मोठ्या धुमधडाक्यात साजरे करतात.
माणुस अगदी साधा आहे आमटी भात ऐवढे मिळाले की तो कोठे ही सुखी होऊ शकतो. ही माणसे साधी असलीतरी विलक्षण मजबूत असतात.डोंगर-दर्या,नदी-नाले,काटे-कुटे सहजपार करून जातात .संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांची शिकवण आचरणात आणुन जिवनात वागतात व जिवनावर प्रेम करून जिवन जगतात.
(शब्दांकन-,सुभाष तळेकर अध्यक्ष मुंबई डबेवाला असोशिएशन मो.९८६७२२१३१०)




