तळेगाव दाभाडे :
ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधवांनी घेतलेले कष्ट आणि आज हर्षदाने आणि तिच्या पालकांनी घेतलेले कष्ट हे सारखेच असल्याचे जाणवते. ते कष्ट खूप प्रामाणिक आणि ध्येयाशी एकरूप असल्यानेच प्रतिष्ठेच्या पदकांची प्राप्ती होऊ शकली असे मत इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध उद्योजक मा. रामदासजी काकडे यांनी व्यक्त केले. जागतिक वेटलिफ्टिंग (कनिष्ठ गट) स्पर्धेत भारताला पाहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या हर्षदा गरुड हिच्या पालकांच्या सत्कार समारंभात काकडे बोलत होते.
यावेळी संस्थेचे कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे, हर्षदा गरुड हिचे वडील श्री शरद व सौ रेखा गरुड, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.संभाजी मलघे,उपप्राचार्य मा. अशोक जाधव,फार्मसी महाविद्यालयाचे डॉ बी बी जैन प्रा. जी एस शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
हर्षदा ही इंद्रायणी महाविद्यालयाची विद्यार्थीनी असल्याचा अभिमान आहे.या कामगिरीमुळे हर्षदा खऱ्या अर्थाने भारतकन्या म्हणून ओळखली जाईल आणि हाच तिचा योग्य सन्मान असेल असे काकडे यांनी सांगितले. या प्रसंगी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतर्फे एक लाख रुपायांचा धनादेश बक्षीस म्हणून हर्षदाच्या पालकांना मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना या यशामागचा हर्षदाचा खडतर प्रवास मांडताना हर्षदाचे वडील शरद गरुड हे भावनिक झाल्याचे दिसले.केवळ पदकाची कमाई करण्यासाठी खेळू नका तर उत्तम आरोग्यासाठी खेळा ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत असेल असे अवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
पालकांनी खेळामध्ये पाल्याचे करिअर घडवताना आर्थिक तडजोडीचा विचार बाजूला ठेवून कष्ट घ्यावे असा सल्लाही त्यांनी पालकांना यावेळी दिला.विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात योग्य शिक्षण घ्यावे आणि आपला वेळ कारणी लावावा. पाल्याने पालकांची फसवणूक करू नये.ती आपण आपली स्वतःची फसवणूक करतो हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे असे शरद गरुड यांनी सांगितले.
हर्षदाची आई म्हणवून घेताना आज खऱ्या अर्थाने उर भरून आल्याचे हर्षदाची आई रेखा गरुड यांनी सांगितले.यावेळी हर्षदाला प्रशिक्षण देणारे तिचे प्रशिक्षक बिहारीलाल दुबे बोलताना म्हणाले की,याच इंद्रायणी महाविद्यालयात मीही वेतलिफ्टिंग शिकलो. आज मावळाच्या मातीत मुलींनी जितकी चमकदार कामगिरी खेळाच्या क्षेत्रात केली तितकी चांगली कामगिरी मुलांना करता आली नाही. हे निर्विवाद सत्य आहे.ग्रामीण भागातील खेळाडू हेरून त्यांच्यातील गुणांना चालना देऊन त्यांना खेळाच्या योग्य प्रवाहात आणले तर पदकं आपल्यापासून दूर नाहीत असे दुबे म्हणाले. यावेळी संस्थेचे कार्यवाह मा. चंद्रकांतजी शेटे यांनी महाविद्यालयाच्या उत्तम क्रीडा वरश्याचा आढावा घेतला.
इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी स्वागत व प्रस्तावित केले आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य यांनी सांगितले की प्रथम वर्ष कला शाखेत शिकणारी हर्षदा ही अत्यंत हुशार,गुणी व कष्टाळू विद्यार्थिनी असून तिच्याजवळ जिद्द ,चिकाटी व प्रचंड मेहनत करण्याची ताकद आहे. त्यामुळे तिने हे सुवर्णपदक पटकावले आहे.
तर उपप्राचार्य जाधव सर यांनी आभार मानले. शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुरेश थरकुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

error: Content is protected !!