डोळ्यात आसवे व जड अंतःकरणाने निरोप
सदिच्छा समारंभात आंदर मावळातील विद्यार्थ्यांची स्थिती
वडगाव मावळ:
येत्या महाराष्ट्र दिनी हे शैक्षणिक वर्ष समाप्त होत आहे.संकलित २ परीक्षा होऊन मुल्यमापन झाल्याने आंदर मावळातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांचे सदिच्छा समारंभ होत आहेत.अंगणवाडीतून प्राथमिक शाळेत येताना उत्सुक असणारे बालकांचे चेहरे आता शाळेच्या वियोगाने रडवेले झालेले आहेत.
तंत्रस्नेही शिक्षण,अध्यापनात शैक्षणिक साधनांचा वापर,विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग,विविध सहशालेय उपक्रम,स्पर्धा यामुळे विद्यार्थी शाळेत रमून जातो.सवंगड्यांसोबत अभ्यास करताना व खेळ खेळताना त्याचे भान हरपून जाते.शाळेशी त्याची घट्ट मैत्री बनते.अशा शाळेला सोडून दुसऱ्या शाळेत जाण्यास तो मानसिकदृष्ट्या तयार होत नाही.सदिच्छा समारंभावेळी या सर्व भावना मनोगतातून व अश्रुंच्या माध्यमातून व्यक्त होतात.अनेक शाळांमध्ये विद्यार्थी खाऊसाठी साठवलेला पैसा गोळा करुन शाळेला भेटवस्तू देतात.शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.आंदर मावळात सदिच्छा समारंभात विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आसवे व जड अंतःकरणाने शाळेला निरोप अशीच स्थिती आहे.
शितल दंडवते
उपशिक्षिका,जि.प.प्रा.शाळा,माळेगांव म्हणाल्या,”
विद्यार्थी शाळेतील अध्ययन प्रक्रियेत समरस होऊन ज्ञान ग्रहण करतात.त्यांना शाळा खूप आवडते.परंतु शाळेला निरोप देण्याची वेळ आल्यावर त्यांना साहजिकच दुःख होते.सदिच्छा समारंभात त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या जातात.
तानाजी शिंदे
पदवीधर शिक्षक,जि.प.प्राथमिक शाळा,भोयरे म्हणाले,”
पहिलीपासून सातवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले असल्याने विद्यार्थ्यांची शाळेशी नाळ जुळलेली असते.माझी शाळा,माझा वर्ग,माझे शिक्षक ही भावना त्यांच्या मनात रुजलेली असते.मनापासून आवडणारी शाळा सोडून जाताना ते दुःखी होतात.
रिद्धी तळावडे जि.प.प्रा.शाळा,कोंडीवडे म्हणाली,”
मला माझी शाळा खूप आवडते.विविध उपक्रम,स्पर्धा यामुळे आमच्यात विविध कौशल्ये निर्माण होतात.आमचे शिक्षक आमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सातत्याने झटत असतात.अशी शाळा सोडून जाताना खूप वाईट वाटते.

error: Content is protected !!