माझा आदर्श आणि शिक्षकांचे आधारस्तंभ….कै.धो.य.खांडभोर गुरुजी
मावळमित्र न्यूज विशेष:
मी १९९१ साली जांभूळ गावी शिक्षिका म्हणून रुजू झाले . तेव्हा माझे सहकारी शिक्षक म्हणून माझ्या सोबत महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटनेचे मा.अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे सच्चे कार्यकर्ते मा.श्री .वि.म.शिंदे सर कार्यरत होते. तेव्हा संपूर्ण पुणे जिल्ह्यातच नव्हे तर आख्या महाराष्ट्रात शिंदे – खांडभोर या जोडीला कोणी ओळखत नव्हते असे नाही.
मी कोल्हापूर जिल्ह्यातील माझ्या गावी जेव्हा जेव्हा जात असे तेव्हा मावळ मध्ये नोकरी करते म्हटले की ,खांडभोर गुरुजींच्या तालुक्यात काय म्हणून विचारले जात होते . मी सलग पंधरा वर्षे जांभूळ शाळेत सेवा केली .यावेळी १९९५ पर्यंत वि.म.शिंदे सर माझे सहकारी शिक्षक होते.त्यानंतर ते केंद्रप्रमुख झाले.पण या १९९१ – ते १९९५ या पाच वर्षात खांडभोर गुरुजींचा अगदी जवळून अनुभव आला.
तेव्हा ते नागाथली शाळेत काम करत होते व शिक्षक पतसंस्था वडगांव येथे तसेच हरकचंद रायचंद बाफना डी.एड्.काॕलेज आणि शिक्षक संघटनेच्या विविध पदावर ते कार्य करत होते. शाळा भरली की सर्व शाळेची कामे मार्गी लावून बुलेट वरून ते जांभूळ मार्गे वडगावला येत असत. त्या काळात मोबाईल नव्हते म्हणून आपल्या मिञाला म्हणजेच शिंदे सरांना घेऊन जाण्यासाठी ते रोज जांभूळ शाळेत येऊन जात.कधीकधी त्यांच्या सोबत अजूनही काही लोक असत मग काय जांभूळ शाळेत त्यांचा चांगलाच गप्पांचा फड रंगायचा .आम्ही आपापल्या वर्गात असलो तरी त्यांचा तो करारी आवाज शालेय परिसरात घुमायचा. एखाद्या आमदार ,खासदाराला सुध्दा व्यक्तीमत्व लाभत नाही असं व्यक्तीमत्व लाभले होते खांडभोर गुरुजींना.
अनेक वेळा गुरुंजींचे विचार ऐकण्याची ,त्यांच्याशी बोलण्याची संधी मला जांभूळ शाळेत असताना मिळाली. त्यानंतर शिक्षककांचे अधिवेशन असो,तालुका मिटिंग असो ,सोसायटी ची वार्षिक सभा असो खांडभोर गुरुजींचा बुलंद आवाज ऐकायला मिळायचा.आपल्या शिक्षक बंधूभगिनींवर झालेला अन्याय ते कदापि सहन करत नव्हते .मावळ मध्ये येणारे गटशिक्षणाधिकारी असो किंवा गटविकास अधिकारी असो सगळे खांडभोर गुरुजींना घाबरून असायचे. शिंदे सरांच्या व खांडभोर गुरुजींच्या प्रभावानेच मी १९९१ पासून आजपर्यंत एकाच संघटनेत अगदी प्रामाणिकपणे काम करत आली आहे .
सध्या मी पुणे जिल्हा महिला संघटनेची प्रतिनिधी म्हणून काम करते आहे . खांडभोर गुरुजींनी महिलांना कधीही कोणत्याही प्रकारचा ञास होऊ दिला नाही . गरजू लोकांना सोसायटी चा अर्ज पूर्णपणे न भरून होताच चेक हातात दिलेला मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे .त्यांना माहिती होतेकी आपला शिक्षक किंवा शिक्षिका भगिनी कर्ज बुडवून कुठेही जाणार नाहीत .केवढा हा विश्वास . शिक्षक पतसंस्थेमध्ये आमचा विद्यार्थी विकास ओव्हाळ आणि सुहास गायकवाड यांना कायमस्वरुपी मानधनावर काम देऊन त्यांच्या आयुष्याचे सोने केले . अनेक शिक्षकांना त्यांनी नेते म्हणून पुढे आणले .समाजात त्यांना एक मानाचं स्थान मिळवून दिले. सोसायटी मध्ये महिला सदस्यांना आणले. आजही माझ्या डोळ्यांसमोर खांडभोर,शिंदे ,वाघमारे,जांभूळकर,खिलारे,पवार,कार्लेकर,म.न.शेख,गुजराथी, कै.राजू खरात,जगदाळे सर यांची पांढऱ्या शुभ्र कपड्यातील ही सर्व मंडळी जसेच्या तसे दिसतात.
शिंदे सर आमचे सहकारी शिक्षक होते त्यामुळे ही सर्व मंडळी जांभूळ शाळेत येत असत म्हणूनच यांचे आणि आमचे एका कुटुंबासारखे नाते तयार झाले होते. शिंदे सर ,खांडभोर गुरुजी आम्हांला महिलांना सदैव प्रोत्साहन देत असत ते नेहमी म्हणायचे महिलांनी राजकारणात उतरले पाहिजे .पुढे येऊन तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे .बोलायला शिका बायानों बोलायला शिका म्हणायचे. आणि त्यामुळेच त्यांचा आदर्श मी माझ्या डोळ्यांसमोर ठेवून शिक्षक संघटनेच्या महिला प्रतिनिधी पर्यंत पोहचले. मावळ तालुका शिक्षक पतसंस्थेची २०१० साली निवडणूक पण लढवली.
आज या सर्व शिक्षक नेते मंडळींचा आदर्श घेऊनच मी रोटरी क्लब आॕफ तळेगाव एम्.आय.डी. सी.च्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली.जेव्हा आपल्या पतसंस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा एक मासिक छापले होते ,त्या मासिकात खांडभोर आणि शिंदे या दोघांच्या मिञ जोडीवर ” ज्ञानियांचा राजा ” नावाची कविता लिहिली होती .कोणाकडे ते मासिक असेल तर आजही ती कविता त्या दोघांना किती समर्पक आहे हे कळून येईल. गुरुजींचे व्याही कै.मारुतराव गाडे ( आण्णा ) यांनाही मी अगदी जवळून पाहिले आहे .त्यांना शिक्षकमिञ नावाने ओळखले जात असे.
गुरुजींनी अतिशय कष्टाने व जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन इतक्या उंच भरारी घेतली .संसाराची घडी छान बसवली दोन्ही मुली व दोन्ही मुलांचे अगदी व्यवस्थित करून ठेवले. रिटायर झाल्यानंतर थोडासा वेळ मला देतील अशी वेडी आशा बाळगून असणाऱ्या सुमनताईंचा हिरमोड करून चार वर्षापूर्वी कै.खांडभोर गुरुजी आपल्या सगळ्यांना सोडून चिरशांततेत विलीन झाले.संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जाऊ लागली.
कारण मावळचा ढाण्या वाघ, शिक्षकांची बुलंद तोफ कायमची पडद्याआड झाली होती . मला आठवते मी त्यांच्या निवासस्थानी नागाथलीला जेव्हा शोकसभा झाली तेव्हा ही माझ्या मनातील भावना मी तिथे व्यक्त केल्या होत्या .मला त्यांच्या बद्दल खूप आदर होता ,आहे आणि कायम राहील. माझे आदर्श कै.धो.य.खांडभोर गुरुजींच्या या चौथ्या पुण्यस्मरणा निमित्त त्यांना लाख लाख अभिवादन व सस्नेह वंदन.
(शब्दांकन- सुमती शंकर निलवे,महिला प्रतिनिधी पुणे जिल्हा शिक्षक संघटना)

error: Content is protected !!