माझ्या आठवणीतील खांडभोर गुरुजी:आंदर मावळचा ढाण्या वाघ
मावळमित्र न्यूज विशेष:
मावळ तालुक्याच्या भूमीला जसा ऐतिहासिक वारसा आहे. तसा भक्तीचा सुगंधही आहे.संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली यांची संजीवनी समाधी पवित्र इंद्रायणी नदीच्या तीरावर आहे.त्या इंद्रायणीमाईचा उगम मावळातला. पवनामाई,आंदरामाई याही याच मावळातील.ज्यांना फक्त संथगतीने वाहत जायच इतकेच माहिती. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग ओव्या गात तल्लीन होणारा वारकरी तोही याच मावळातील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात रमणारा येथील रांगडा गडी.रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस हायवेने शहराशी जोडल्या तालुक्यात माणुसकीचा झरा ओतप्रोत भरला आहे. जितका मावळ निसर्ग सौंदर्याने समृद्ध तितकाच मनानेही श्रीमंत. शिवरायांच्या अठरा मावळापैकी पवन मावळ, नाणे मावळ, आंदर मावळ ही मावळे शेती आणि दह्यादुभत्यांनी भरलेली होती. छत्रपतींची ही मावळ, तीन पवित्र नद्या, तीन महान विभूती आणि व्यापार, उद्योग, शेतीत अग्रणी.
मावळात फेरफटका मारला की,आपसूक अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा…दगडांच्या देशा…बकुळ फुलांच्या दलदारी देशा…या पदपंक्ती गुनगुनल्या जातात. दुर्गम, डोंगर, दऱ्या-खोऱ्यात पसरलेले आंदर मावळ आणित्या मध्ये सह्याद्रीच्या कुशीत वसलेले नागाथली हे खेडेगांव. जिजाबाई व यशवंतराव या शेतकरी दांपत्याच्या पोटी जन्मला एक तेजस्वी हिरा जन्माला.त्याच नाव धोंडीबा ठेवले. त्याच्या जन्माच्या काळात पोरांची नावे,धोंडिबा,दगडू,काळू,विठू,नागू अशीच ठेवायची. आजच्या सारखी स्टॅण्डर्ड नावे ठेवायची रीतच नव्हती. सिता,मथा दोन बहिणी. बालवयात पितृछत्र हारपले. जिजाऊ माऊलीने काबाडकष्ट करुन मुलांना जोपासले,वाढवले,मोठे केले पोटाला चिमटा घेतला. पण लेकाला शिकवला. नुसता शिकवला नाही तर त्याला कष्टाची जाण बालवयात करून दिली.
कंबर कसून शेती केली. पण माऊली मागे हाटली नाही. हे सर्व करत असताना मुलाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. वहानगांवच्या लोकल बोर्डाच्या शाळेत,टाकवे बुद्रुकच्या प्राथमिक शाळेत अन वडगाव मावळच्या रयत शिक्षण संस्थेत माध्यमिक केले.
धों.य.खांडभोर गुरुजी लहानपणापासून कष्टाळू व जिद्दी होते. माध्यमिक शिक्षण पूर्ण करता करता त्यांनी प्राथमिक शिक्षकाची नोकरी सुरु केली. शिक्षणा सारख्या पवित्र कार्यात उडी घेतली. घरचा कसलाही वारसा नसताना धों. यं. नी शैक्षणिक, सामाजिक, राजकिय, क्रिडा, व्यापार, उद्योग, शेती, सांप्रदायीक क्षेत्रात केलेली कामगिरी लक्षणीय ठरली.प्रत्येक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे होते.
शिक्षकाची नोकरी करता करता गोर गरिबांच्या मुलाच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी
महसुल राज्यमंत्री मा.श्री. मदन बाफना साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकाऱ्यांच्या मदतीने श्री संत
तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. बाफना साहेब अध्यक्ष व धों.य. सचिव म्हणून कार्यरत राहिले.संस्थेची पहिली शाखा टाकवे बुद्रुक येथे सुरु केली. नंतर काळाच्या ओघात वडगांव येथे प्राथमिका शाळा,डी.एड्., बी.एड्., एम.एड्. महाविद्यालय तसेच ज्युनियर, सिनियर, कॉलेज, विविध व्यावासायीक कोर्सेस सुरु केले.तसेच संस्थेची वडगांव, टाकवे बु।।. येथे स्वत:च्या इमारती डौलत आहे.
पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ संचालित शिक्षण प्रसारक मंडळ पुणे या संस्थेचे ट्रस्टी व अध्यक्ष म्हणून
प्रभावी कामकाज या संस्थेत देखील अंगणवाडी, बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, इंग्लिश मेडीयम, डी.एड्. इ. शाखासध्या कार्यरत आहे. संस्थेचे एरंडवणा पुणे येथे सुसज्ज भव्य इमारत आहे.लोकनेते शरदचंद्रजी पवारशिक्षण संकुल आहे. मुलींचे वस्तीगृह चालु आहे. तसेच कसबा पेठ येथे मुलींचे वस्तीगृह आहे. संघ, शिक्षण मंडळ,वस्तीगृह या तिन्ही शाखेचे धों.य. नऊ वर्षे अध्यक्ष म्हणून प्रभावीपणे कार्यरत होते. त्यांच्या कारकिर्दीत संघाच्या तिन्ही शाखा प्रगतीपथावर भरभराटीस आल्या.
खांडभोर गुरुजींचे सामाजिक कार्य देखील वाखण्यासारखे होते. आंदर मावळातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था,दूध उत्पादक संस्था,पाणी पुरवठा संस्था स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता. या संस्थेत ते अनेक वर्षं अध्यक्ष होते. माननीय मदन बाफना साहेब तालुका पंचायत समितीचे सभापती असताना,आंदर मावळातील वीज,रस्ते,पूल,समाज मंदीरे,स्मशान भूमी,पाणी पुरवठा योजनांचा गुरूजींनी केलेला पाठपुरावा आणि मंजूर करून घेतलेली कामे ग्रामीण विकासाची नांदी होती. ठोकळवाडी धरणाचे पाणी पिण्यासाठी आणि शेतीला मिळावे यासाठी झालेल्या अंदोलनाचा पहिला दगड गुरूजींनी बाऊडीत भिरकवला. या अंदोलनात गुरूजी आघाडीवर होते.
ज्ञा.र.कोळी गुरूजी खांडभोर गुरुजींचे गुरू,त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वतःच्या उपजत गुणांच्या जोरावर ,विशेषत: वकृत्व गुणावर त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले. मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे आठ वेळा चेअरमन,तालुका शिक्षक संघाचे अनेक वर्षे अध्यक्ष,जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष पदावर केलेले काम शिक्षक संघटनेच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिले गेले. या काळात शिक्षकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले,त्यासाठी अनेक अंदोलने झाली .मोर्चे निघाले त्याच श्रेय गुरूजींना जाते.
तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरात प्राथमिक शिक्षकांच्या निवासासाठी शिक्षक गृह निर्माण सहकारी संस्था स्थापन केली. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर छप्पर उभे राहीले. सामाजिक बांधीलकी मानून या गृहनिर्माण सहकारी संस्थेने श्रीमंत महादजी शिंदे स्मारक समितीला २५ते ३० गुंठे जागा दिली. जिथे स्मारक आणि गार्डन दिमाखात उभे राहिले आहे.
शैक्षणिक व सामाजिक कार्यात रमणारे गुरूजी कुटूंब वत्सल होते. सुमन ताईनी घरगाडा संभाळला,प्रपंच समृद्ध केला. मुलांचे शिक्षण आणि संगोपनात त्यांनी कुठेच कुचराई केली नाही. राज इंजिनिअर असून नामांकित कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतोय. शरद वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवून शेतीत रमला सुनिता शिक्षिका आहे. सारीका गृहिणी आहे. संसारातील रथाची दोन्ही चाके योग्य गतीने धावत असल्याचे गुरूजी आणि सुमन ताई यांच्या कडे पाहिले की जाणवायचे.
गुरूजींना राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातील मोठा गोतावळा आहे. या गोतावळयाची ऊठबस सुमन ताई यांनी नेहमीच केली. कर्तबगारीला या परिवाराने माणुसकीची जोड दिली. वडगाव नागाथली तीस किलोमीटर अंतर,वडगाव पुणे चाळीस किलोमीटर अंतर गुरूजींनी बुलेटवरून कायमच पार केले. रोजचा हा प्रवास त्यांनी ऊन,वारा,पावसात कधीच थांबवला नाही. गुरूजींच्या बुलेट प्रवासाला वेळेच कधीच बंधन नव्हते. नागाथलीत रात्री उशीरा बुलेट वर प्रवास करणारे गुरूजी एकटेच.अपरात्री निर्जन रस्त्यावर बुलेटची रपेट आणि सोबतीला वन्यप्राणी असा गुरूजींचा प्रवास सबंध मावळकरांनी पाहिला. खांडभोर गुरुजी रूबाबदार आणि तितकेच दमदार नेतृत्व आम्हा शिक्षक मंडळीना मिळाला.
शिक्षकांसाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी लढणारा हा दिलदार मित्र हरपला. याचे एकीकडे दु:ख असतानाच दुसरीकडे त्याची प्रतिकृती असलेल्या राजू कडे समाजाचे लक्ष आहे. वेगवेगळ्या सामाजिक,शैक्षणिक संस्थेचा पदाधिकारी असलेल्या राजूच्या रूपाने आम्हाला धो.य.दिसतोय. राजूची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ते पदी निवड झाली. गुरूजींचे तेच वकृत्व आणि नेतृत्व राजू प्रस्थापित करेल असा आम्हाला विश्वास आहे,असो हा सगळा लेखन प्रपंच गुरूजी यांच्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त आपसूक झाले. हे लिहताना गतकाळातील अनेक गोष्टींना सहज उजाळा मिळाला. आमच्या मित्रत्वाचे अनेक दागेदोरे एकत्र मिसळले आहेत.धो.य.खांडभोर,वि.म.शिंदे,सु.बा.पवार,ज्ञा.कृ.खिलारे,भगवंत जांभूळकर,रणदिवे,भानुसघरे असे एक ना अनेक आमच्या शिक्षक मित्राचे मित्रत्वाचे नाते जोडले गेले ते कधीच न तुटण्यासाठी. धो.य. खांडभोर यांच्या सहवासातील अनेक क्षण व प्रसंग नव्या पिढीसाठी आशावादी ठरतील ऐवढे या निमित्ताने लिहून शब्दांना पूर्ण विराम देतो.
(शब्दांकन- वि.म.शिंदे गुरूजी,वडगाव मावळ)

error: Content is protected !!