प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता कायम ठेवून नवनिर्मिती करणा-या आदर्श ग्रामसेविका प्रमिला मारुती सुळके-जगताप
मावळमित्र न्यूज विशेष:
शिस्त व जबाबदारीचं बाळकडू त्यांना बालपणीच मिळाले.कामातील प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता कायम ठेवायची.ती ठेवली तरच नवनिर्मिती होते.या नवनिर्मिती मुळे कामातील आनंदाचे व समाधानाचे क्षण सातत्याने प्रेरणा देतात. प्रसन्नता देऊन जातात.असाच नोकरीतील प्रामाणिकपणा संभाळून कष्टाच्या जोरावर गावांचा कायापालट करणा-या आणि शासनाच्या विविध पुरस्कारांच्या मानकरी भोयरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका प्रमिला मारुती सुळके-जगताप ठरल्या. पुणे जिल्हा परिषदेने त्यांना आदर्श ग्रामसेविका पुरस्कार दिला आहे.
पुणे जिल्हा परिषदेने त्यांना आदर्श ग्रामसेविका पुरस्कार देऊन गौरविले आहे. वैयक्तिक पातळीवरील हा त्यांचा पुरस्कार.यापूर्वी सुळके ताईंनी ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी ग्रामसेविका म्हणून काम केले,त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांनी अनेक मानाचे पुरस्कार मिळवून दिले आहे. ग्रामपंचायतीला मानाचे पुरस्कार आणि लाखो रुपयांची बक्षीसे मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे .गावपातळीवर काम करताना आलेल्या अनुभवाचा प्रकल्प सादर केल्यावर त्यांच्या प्रकल्पाची नोंद ब्रिटिश वेबसाईटने घेतली .इतकेच काय यशदा या संस्थेतर्फे त्यांचं अभिनंदन आणि कौतुक सुद्धा झाले. प्रमिला सुळके यांची भोयरे ग्रामपंचायतीच्या आदर्श ग्रामसेविका ही ओळख पुणे जिल्ह्यात झाली.त्यांचं नाव प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या यादीत अव्वलस्थानी आहे.हा बहुमान काही एका दिवसात मिळाला नाही,त्यासाठी कष्टाची तपश्चर्या करावी लागते. ती तपश्चर्या सुळके यांनी केली,यासाठी कधी अपमानही सहन केला.
शिरूर तालुक्यातील धामारी गावच्या मारुती बाळासाहेब शेळके यांच्या त्या कन्या. वयाच्या दहाव्या वर्षी आई बायडाबाई यांचे निधन झाले. प्रमिला सह दोन भावंडे .प्रवीण बालवाडीत असताना आणि बहिण प्रतिभा दोन वर्षाची असतानाच पोरकेपणा नशिबी आला.हा पोरकेपणा वरवर दिसत असला तरी एकत्रित कुटुंब पद्धतीत हा पोरकेपणा जाणवलाच नाही.चुलते दत्तात्रेय आणि चुलती शालन यांनी आई वडिलांची माया ठेवून प्रमिलाला सुसंस्कृतपणाचे धडे दिले.सुळके कुटूबियांची धामारीत घरची शेती .कुटुंबाचा डामडौलही मोठा.मारुती सुळके यांचा चार भावांचा प्रपंच .
दत्तात्रेय ,शांताराम ,नानाभाऊ या भावांना आपलेपणा जपला. आजही हे सर्व भाऊ गुण्यागोविंदाने एकाच कुटुंबात राहत आहे. मारुती सुळके पोलीस कर्मचारी. शिस्तीचे उपासक हीच शिस्त आणि प्रामाणिक पणा त्यांनी लेकीच्या अंगी उतरवला.
प्रमिला यांचे शिक्षण धामारी आणि पुणे शहरात झाले. प्रमिला यांनी मोराची चिंचोली येथे कृषी पदविका शिक्षण घेतलं.आणि पहिल्याच वर्षी २००४ साली खेड तालुक्यातील कोयाळी तर्फे चाकण या गावात ग्रामसेविका म्हणून नोकरीला सुरुवात केली .कोयाळी तर्फे चाकण या पाठोपाठ सोळू,शेलगाव, चिंचोली येथेही ग्रामसेविका म्हणून त्यांनी नोकरी केली.ही गावं राज्य शासनाच्या निर्मलग्राम पुरस्कारास पात्र करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला .स्वच्छतेच्या बाबतीत आपण असंवेदनशील असल्याचे चित्र काही वर्ष महाराष्ट्राने पाहिले. पिण्याचे पाणी स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण केलेले असावे ,असा शासनाचा अट्टाहास असतो. या कामाकडे गावकऱ्यांचं नेहमीच दुर्लक्ष असायचं,तसचे प्रमिला सुळके नोकरी करीत त्याही गावात असच दूर्लक्ष होते.
ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी अस्वच्छ होती,ती स्वच्छ करायला काही कोणी पुढे धजावत नव्हते.सुळके मॅडम यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावातील पाणी साठवण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी हातात झाडू घेतला. आणि पाण्याच्या उंच टाकीवर जावून त्या टाकी स्वच्छ करू लागल्या .ग्रामसेवक बाई पाणी स्वच्छ करण्यासाठी स्वतः राबत आहे .हे पाहिल्यावर स्थानिक गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन टाकी तर स्वच्छ केली. शिवाय परिसर स्वच्छ केला.हा अनुभव त्यांनी त्यांच्या नोकरी अंतर्गत प्रशिक्षणात प्रकल्प मांडला. लोकसहभाग तील पाण्याची टाकी स्वच्छतेच्या या प्रकल्पाला मानांकन मिळाले.सुळके यांच्या या प्रकल्पाची दखल यशदा ने घेतली. इतकेच काय ब्रिटिश वेबसाईटने ही घटना शब्दबद्ध केली. आणि बेबसाईटवर अपलोड केली.सुळके यांनी ज्या ग्रामपंचायतीमध्ये नोकरी केली. त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाचे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले.
मग तो पुरस्कार आदर्श कृषी ग्राम पुरस्कार असेल ,संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील पुरस्कार असेल, आर आर आबा पाटील सुंदर गाव स्पर्धेतील पुरस्कार असेल, तो पुरस्कार मिळवून देण्यासाठी त्यांनी लोकसहभाग मिळवला. आर .आर .आबा पाटील स्वच्छ गाव सुंदर गाव या स्पर्धेत मावळ तालुक्यातील भोयरे ग्रामपंचायतीला जिल्हा व तालुका स्तरावरील दुहेरी पुरस्कार प्राप्त झाल्याने गावाला पन्नास लाख रुपये बक्षीस मिळाले. पुणे जिल्ह्यातल्या तेरा तालुक्यातून पहिलं बक्षीस मिळवणारी भोयरे एकमेव ठरली.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्या कायमच कर्तव्यदक्ष असतात.ग्रामपंचायतीचं आयएसओ नामांकन असो, की अंगणवाडीचा आयएसओ नामांकन. त्या सदैव तत्पर आहेत .खेड तालुक्यातील १५ वर्षाच्या नोकरीनंतर त्यांची प्रशासकीय बदली झाली. त्यांनी मावळ तालुक्यातील भोयरे ग्रामपंचायतीच्या पदभार स्वीकारला .
भोयरे मावळ तालुक्याच्या राजकीय पटलावर कर्तबगारी सिद्ध केलेले महत्त्वाचं गाव .कै.राणबा भोईरकर यांचे गाव.कै.राणबा भोईरकर यांचा भोयरे ग्रामपंचायतीचे सरपंच ते पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक असा त्यांचा प्रवास होता. गाव छोटं असलं तरी स्वयंपूर्ण आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेले हे गाव
गावचे विद्यमान सरपंच बळीराम भोईरकर.कै.राणबा भोईरकर यांचे चिरंजीव तेच गावचे सरपंच आहे.त्यांच्याच कालावधीत सुळके यांनी ग्रामपंचायतचा पदभार स्वीकारला .ग्रामपंचायत कर्मचारी ,ग्रामस्थ, शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सर्वांच्या मदतीने त्यांनी केलेली कामं वाखाणण्यासारखी आहे .कोरोना काळात गावकऱ्यांची केलेली सेवा निश्चितच कौतुकास्पद आहे. शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी त्या आग्रही असतात.
उंब-याच्या आतील आणि उंबऱ्याच्या बाहेरील विकासाच्या योजना राबवण्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करण्यात त्यांचा हातखंडा आहे. मावळ तालुक्याचे गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, गट विकास अधिकारी सुधीर भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ग्रामपंचायतीतील विकास कामे केली. शासनाच्या विविध योजना, शासनाने विहित नमुन्यात घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे ,या सर्वांचे त्या पालन करीत आहे. शासनाच्या योजना,गावासाठी पुरस्कार, नामांकन मिळवून गावाचं नाव मोठं करण्यासाठी सुळके राबत आहे.यासाठी वेगवेगळ्या कल्पना राबवून त्यांनी लोक सहभाग वाढवला. ३१ मार्च अखेर शंभर टक्के कर वसुली करण्याचा त्यांचा हातखंडा कायम आहे.
त्यांच्या या सगळया यशात त्यांचे पती अशोक जगताप आणि जगताप कुटुंबीय यांचाही मोलाचा वाटा आहे. प्रमिला सुळके म्हणाल्या ,” ग्रामसेवक पदावर ज्या दिवशी नेमणूक झाली. त्याच दिवशी जास्तीत जास्त चांगले काम करील. नागरिकांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मूलभूत सुविधा मिळाव्यात .लाभ घेता यावा,यासाठी आपले काम उजवे असावे असा संकल्प केला होता. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करते. कामात सातत्य ठेवल्याने यश मिळत गेले. या सर्वाचे श्रेय लोकप्रतिनिधी ,प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच ,उपसरपंच ,सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी, गावकरी, गाव पातळीवरील शासकीय यंत्रणेतील सर्व कर्मचारी आणि कुटुंबीय यांना आहे. पुरस्कार मिळतील नाव मिळेल.यापेक्षा विकास कामे करून ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव गाव’ ही संकल्पना राबून त्यासाठी काम करण्यास आनंद हा पुरस्कारांपेक्षा कितीतरी पट मोठा आहे.

error: Content is protected !!