वडगाव मावळ :
शेतीच्या वादातून मनात राग ठेवून चुलत भावाने बहिणीच्या डोक्यात, तोंडावर, मानेवर व हातावर धारदार कोयत्याने ३५ वार करून बहिणीचा खून केल्याची घटना रविवारी (दि. १३) दुपारी ४:४५ वा. तळपेवाडी माळेगाव बुद्रुक ता. मावळ जि. पुणे हद्दीत घडली. आरोपीला बुधवारी (दि. १६) वडगाव मावळ न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश घट्टे यांनी दिली.
फासाबाई साळू निसाळ वय ३८ रा. तळपेवाडी, माळेगाव बुद्रुक ता. मावळ असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. वसंत राघू माळी (वय २८, रा. तळपेवाडी माळेगाव बुद्रुक, ता. मावळ) असे खुनातील आरोपीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत फासाबाई निसाळ व त्यांचे पती साळू निसाळ हे धरणाच्या शेतात फरसबी लावण्याचे काम करण्यासाठी सकाळी गेले दुपारी पडाळी वरच्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी फासाबाई निसाळ गेल्या व साळू निसाळ शेतात काम करत होते. फासाबाई निसाळ पडाळी वर गेल्या असता, आरोपी वसंत माळी हा दबा धरून बसला होता, शेतीच्या वादातून वारंवार भांडणं होत असल्याचा राग मनात ठेवून फासाबाई निसाळ यांच्या डोक्यात, मानेवर, तोंडावर व हातावर कोयत्याने ३५ वार करून जागीच ठार केले. महिलेचा खून झाल्याची माहिती वडगाव पोलीस स्टेशनमध्ये दिली.पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश घट्टे, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक विलास भोसले, पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे, विजय वडोदे, रामेश्वर धोंडगे,कर्मचारी प्रकाश वाघमारे, आशिष काळे, अमोल तावरे, शशिकांत खोपडे, संपत वायळ, अजित ननावरे, प्रमोद नवले, अमोल गोरे, श्रीशल कंटोळी, प्राण येवले, मनोज कदम, संजय सुपे,भाऊसाहेब खाडे व चालक गणपत होले आदींनी खुनाच्या गुन्ह्याचा तपासाची सूत्रे फिरवली. या खुनाच्या गुन्ह्याचे कारण तसेच आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे
होते.
पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले होते त्यांची कसून चौकशी केली असता, आरोपी ‘हा मयत महिलेचा चुलत भाऊ होता, मृतदेह उचलण्यासाठी पोलिसांना आरोपी मदत करत होता. आरोपी माळी हा बहीण व दाजीचा खून करणार होता, पण मयत महिलेचा पती साळू उशिरा पोहोचल्याने त्याचा जीव वाचला, आरोपीने खून केल्याची कबुली दिली खुनातील कोयता, सर्व पुरावे तपासले. आरोपी वसंत माळी याला वडगाव मावळ न्यायालयात बुधवारी (दि. १६) दुपारी हजर करणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश घट्टे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

error: Content is protected !!