ऋणानुबंधाचे नातं जपणा-या वात्सल्य माई लताताई
मावळमित्र न्यूज विशेष:
स्वतःसाठी जगणारी माणसे पदोपदी भेटतील. परंतु दुसऱ्याच्या सेवेसाठी जगणारी माणसे विरळच. अशी माणसं भेटायला एकतर पूर्व जन्मीचे पुण्य असायला हवे .नाहीतर ऋणानुबंध असायला हवा.स्वतःसाठी न जगता गोरगरीब माणसांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे म्हणून कित्येक वर्षापासून काम करणा-या आणि प्रसिद्धी पासून दूर असलेल्या लता यशवंत देसाई.लता ताईंत ‘वात्सल्य सिंधू माई ‘चे दर्शन होते, हा मला आलेला अनुभव .
तसे तर त्यांची आणि माझी भेट पूर्वी कधी झालीच नव्हती. माझ्या बदली मावळ तालुक्यात झाली. मला शहरातून येणे शक्य नव्हते,म्हणून मी त्यांच्या आश्रमात राहून माझी नोकरी करीत होते. लता ताईशी माझा स्नेह जडला. आणि दिवसागणिक तो अधिक वृद्धिंगत होत गेला.लता आता माझी सखी झाली होती.लता कृष्णनाथ शिरोडकर घरची परिस्थिती बेताची असलेल्या ब्राह्मण परिवारात जन्मलेली कन्या. १९.३.१९६३ तिचा जन्मदिवस. पार्ले तील टिळक विद्यालयात तिचे शिक्षण झाले. मीना तिची बहीण आणि एक भाऊ.दहावीचे शिक्षण झाल्यावर लताने पार्टटाईम नोकरी करीत पुढचे शिक्षण घेतले. स्टेनोग्राफरची तिने नानावटी रूगालयात नोकरी केली.
याच रूगालयात अस्थमा व्याधीवर पी.एच.डी.केलेले डाॅ. यशवंत देसाई एक भला माणसू. रूग्ण सेवेचे व्रत हाती घेतलेल्या डाॅ. यशवंत यांच्या प्रेमात लता पडली. डॉ. यशवंत देसाई शहाण्णव कुळी मराठा समाजातील आणि लता ब्राह्मण. तत्कालिन परिस्थितीला हा प्रेम विवाह मान्य नव्हता. घरातून समाजातून याला विरोध झाला. लताचे मोठे स्वप्न नव्हते. आणि मोठ्या अपेक्षाही नव्हत्या. डॉ.यशवंत देसाई हेही फार समजदार व्यक्तीमत्व होते. तत्कालिन परिस्थितीचा विरोध स्वीकारून लता आणि डॉ.यशवंत विवाह बंधनात अडकले. पण भली मोठी शपथ घेऊन.
आपल्या स्वतःचे अपत्य नको,आपले उभे आयुष्य रंजल्या गांजल्या साठी,गोरगरीब आणि गरजू लोकांच्या सेवेसाठी ही शपथ घेऊन लताचा विवाह झाला. समाजातील अनेक सुख दु:ख आणि ऊन पावसाला झेलत लता आणि डाॅ .यशवंत यांचे रुग्णसेवेचे व्रत अखंड पणे सुरू होते. अविरतपणे सुरू असलेल्या या कार्याला अधिक व्यापक करण्याचा दृष्टी या दांपत्यांनी बाळगली होती. स्वामी विवेकानंदांची प्रेरणा असलेल्या देसाई पती पत्नीने लग्नानंतर १९८७च्या सुमारास भारत भ्रमण केले. स्वामी विवेकानंद यांच्या विचाराचा आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार हाही हेतू होताच.
म्हणून त्यांनी श्री. स्वामी विवेकानंद रामकृष्ण विवेकानंद आश्रम’ची स्थापना करून आपले कार्य वाढवले. भारत भ्रमण केलेल्या देसाई दांपत्याने आश्रमासाठी मावळ तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसराची निवड केली. पहिले आश्रम शिंदेवाडीत आणि त्या नंतर बोरवलीत स्वामी विवेकानंद यांच्या नावाने आश्रम सुरू केले. स्वामी विवेकानंदांच्या विचाराच्या या आश्रमात आले की आपसूक हात जोडले जातात. पापण्या मिटून एका निरंतर चैतन्याची अनुभूती येते. मनाला उभारी आणि प्रसन्न करणारा हा आश्रम चालते बोलते ज्ञानपीठ असल्याचा भास होतो.
डाॅ.यशवंत देसाई यांचे अकस्मित निधन. लता ताईच्या आयुष्यातील सर्वात दु:खाचा दिवस. आयुष्य सोबत राहण्याच्या आणि दिलेले वचन निभवणारा आधार गेल्याने ते दु:ख पचवणे कठीणच. पण स्वतःसाठी कोणीही जगते. आपले जगण गरीब,गरजू साठी आहे. हे वचन पूर्ण करण्यासाठी लता ताईंनी दु:ख गिळले. आणि आज त्या समाजातील गरजूंसाठी काम करीत आहे. तेही कुठली प्रसिद्धी अथवा गाजावाजा न करता. आदिवासी,कष्टकरी,कातकरी,शेतमजूर यांच्यासाठी त्या काम करीत आहे .त्याच्या चेहर्‍यावर हसू फुलावे म्हणून संथ पणे सुरू असलेले काम अखंडपणे सुरू आहे.मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की,मला लता ताई सारखी मार्गदर्शिका,मैत्रीण,सखी मिळाली.तिला आजच्या महिला दिनी आरोग्यदायी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा..
(शब्दांकन-आशालता गोकुळराव कटके,प्राथमिक शिक्षिका , हिंजवडी ता.मुळशी)

error: Content is protected !!