बाळासाहेब नेवाळे पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार
वडगाव मावळ :
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अ गटातून मावळ तालुका मतदार संघातील बाळासाहेब शंकर नेवाळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार झाल्याने राजकीय अभ्यासकांसह मावळातील राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या भुवया उंचावल्या आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाळासाहेब नेवाळे यांची पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी अचानकपणे उमेदवारी जाहीर केल्याने मावळ तालुक्यातील भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून, भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर विधानसभा निवडणुकीपूर्वी नाराजी व्यक्त करीत नेवाळे भाजपवासी झाले होते. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनेलच्या वतीने मावळ तालुक्यातून बाळासाहेब नेवाळे, आंबेगाव मधून विष्णु हिंगे, भोर मधून अशोक थोपटे, दौंड मधून राहुल दिवेकर, हवेली मधून गोपाळराव म्हस्के, खेड मधून अरुण चांभारे, जुन्नर मधून बाळासाहेब खिलारी, मुळशी मधून कालिदास गोपाळघरे, पुरंदर मधून मारुती जगताप, शिरूर मधून स्वप्नील धमढेरे, वेल्ह्यातून भगवान पासलकर, तर अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून मुळशी येथील चंद्रकांत भिंगारे, महिला प्रतिनिधी मतदार संघातून शिरूर येथील केशरबाई पवार व खेड येथील लता गोपाळे, इतर मागास प्रवर्गातून जुन्नर येथील भाऊ देवाडे व मागासवर्गीय मतदार संघातून शिरूर येथील निलेश तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. व संदर्भातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बाळासाहेब नेवाळे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेवर व जिल्हा दूध संघावर संचालक म्हणून कार्यरत असताना विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षातील वरिष्ट नेत्यांवरील नाराजीमुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर आता पुन्हा अचानकपणे नेवाळे यांना राष्ट्रवादी कडून दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आल्याने तालुका भाजपला धक्का बसला आहे.

error: Content is protected !!