पुणे जिल्हा परिषदेच्या गुणवंत शिक्षक पुरस्काराने उषा भोईटे सन्मानित
वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील धानगव्हाण शाळेतील शिक्षिका उषा भोईटे यांस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते नुकताच पुणे जिल्हा परिषदेचा ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाला.
पुणे येथे झालेल्या सन्मान सोहळ्यास पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,उपाध्यक्ष रणजित शिवतरे,पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर,बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे,बालकल्याण सभापती सारिका पानसरे,मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड इ.मान्यवर उपस्थित होते.
उषा भोईटे या उपक्रमशील अध्यापिका असून त्यांचा ‘रविवार माझा आवडीचा’ हा उपक्रम सर्वत्र प्रसिद्ध आहे.लीप फॉरवर्ड यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘Word power championship’ या स्पर्धेत त्यांचे तीन विद्यार्थी प्रथम आलेले आहेत.त्यांच्या धानगव्हाण या शाळेस आदर्श शाळा हा पुरस्कार मिळालेला असून कृतीयुक्त शिक्षणावर भर दिल्याने या शाळेतील विद्यार्थी प्रगत आहेत.
त्यांनी कोविड काळात विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून वंचित राहू नये यासाठी यूट्यूब चँनलच्या माध्यमातून व्हिडीओ निर्मिती करुन अॉनलाईन पद्धतीने अध्यापन केले होते.नुकत्याच झालेल्या ‘इंग्रजी अध्ययन समृद्धी’ तालुकास्तरीय स्पर्धेत त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे.
त्यांना आजपर्यंत मावळ तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार,मावळ तालुका अंतर्गत खासदार पुरस्कार इ.पुरस्कार प्राप्त झाले असून आपलं घर,पुणे या संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ दिल्ली येथे प्रदान करण्यात आलेला आहे.अभंग प्रतिष्ठाण,देहू यांच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात.
किरीट मोरे यांच्या मार्गदर्शनाखालील वाचनवेड संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मावळातील ८७ शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके मिळवून देण्यात महत्वपूर्ण भुमिका निभावली होती.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल कडधे केंद्राचे केंद्रप्रमुख रामराव जगदाळे,अभंग प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष प्रा.विकास कंद यांनी अभिनंदन तर मावळ तालुक्यातील शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!