तळेगाव दाभाडे:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एक एक कार्यकर्ता जोडला जात असून आज आपला पक्ष तळागाळात उभा होत आहे. आज पक्षाकडे तरुणांची मोठी फळी निर्माण झाल्यामुळे उद्याचा महाराष्ट्र हा राष्ट्रवादीमय असणार असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात पाचव्या दिवशी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाचा तळेगाव दाभाडे येथे आढावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला, यावेळी पाटील बोलत होते.
आपल्या पक्षात आता आमदार सुनील शेळके, आमदार रोहित पवार, आमदार निलेश लंके असे तरुण लोक जबाबदारीने नेतृत्व करत आहेत. २०२९ ,२०३४च्या विधानसभेच्या निवडणुकीचे नेतृत्व आता विद्यार्थी काँग्रेस मध्ये काम करणारी आताची पिढी करेल असा अंदाज पाटील यांनी वर्तवला.
तुमच्या सर्वांच्या ताकदीने सुनील शेळके जवळपास १ लाख मतांच्या लीडने निवडून आले आहेत. असे सांगून प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सर्व मावळवासियांचे आभार मानले. तसेच आमदार सुनील शेळके यांनी आजवर आपल्या मतदारसंघासाठी ९०० कोटींचा निधी मिळवला आहे. अजून अडीच वर्षे बाकी आहेत. आमदार शेळके माणसासाठी झटणारा नेता आहे. संकटाचा काळ संपून मावळच्या प्रगतीचा काळ सुरू झाला आहे. सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली मावळचा विकास नक्की होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मावळाच्या भूमीने आपल्याला शिवरायांचे शौर्य सांगितले आहे. दिल्लीश्वर कितीही कपटी असला कितीही कारस्थानी असला तरी महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही. ही परंपरा शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू आहे, ती यापुढेही कायम राहील असा दावा पाटील यांनी केला.
केंद्रीय जुलमीशाहीचा पाढा वाचताना ते म्हणाले की, आपले सरकार काहींच्या डोळ्यात सलत आहे, त्यामुळे आधी आमदार विकत घेण्याचा प्रयत्न झाला. आता मंत्र्यांवर धाडी टाकल्या जात आहे. अनिल देशमुख यांना खोट्या आरोपात गोवलं, नवाब मलिक यांना खोट्या आरोपात गोवलं, मलिक एनसीबी विरोधात बोलत होते म्हणून त्यांना त्यांची भूमिका मांडू न देता त्यांना अटक करण्यात आली. जाणीवपूर्वक दाऊदचं नाव घेतले गेले आणि एका कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीला तुरुंगात टाकले, अशी टीका ना. जयंत पाटील यांनी केंद्रीय सत्ताधाऱ्यांवर केली. मात्र महाविकास आघाडी सरकार हे महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्तेवर आले आहे. त्यामुळे कोणीही कितीही अडथळे आणले तरी देखील महाराष्ट्र सरकार आपले काम पूर्ण करणार, अशी खात्री पाटील यांनी दिली.
मावळ विधानसभा मतदारसंघाचा आढावा बैठकीला माजी आमदार कृष्णराव भेगडे,आमदार सुनील शेळके, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, महिला सरचिटणीस संगिता साळुंके, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, नगरसेवक गणेश खांडगे, नगरसेवक किशोर भेगडे, नगरसेवक गणेश काकडे, नगरसेवक संतोष भेगडे,कृषी व पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर, कुसुम काशीकर, सारीका शेळके, सचिन घोटकुले, सुनिल दाभाडे, सुवर्णा राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार सुनिल शेळके यांनी मावळच्या जनतेचे आभार मानून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत तालुका राष्ट्रवादीमय होईल असा विश्वास व्यक्त केला. भाजपाला सोडचिठ्ठी देत अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. जनतेने टाकलेल्या विश्वासाला पात्र होऊन लोकप्रतिनिधी या नात्याने विकास कामावर अधिक भर राहील असे स्पष्ट करुन याच जनतेच्या विश्वासावर आगामी निवडणुकीत एकहाती सत्ता मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

error: Content is protected !!