लोणावळा नगरपरिषदेचे आणि नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांचे राज्यपालांकडून कौतुक
लोणावळा :
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर लागोपाठ चार वर्षे यश संपादन करीत संपूर्ण भारत देशात आपली ओळख निर्माण करणाऱ्या लोणावळा नगरपरिषदेचे तसेच नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अभिनंदन केले. तसेच मुंबई येथे राजभवनात नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांचा सत्कार केला.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी स्वतः नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांना राजभवनात आमंत्रित केलं होतं. त्यानुसार नगराध्यक्ष जाधव, माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक श्रीधर पुजारी, भाजपचे गटनेते देविदास कडू, शिक्षण मंडळाचे माजी सभापती आशिष बुटाला यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपाल कोश्यारी यांनी नगरपरिषदेच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करतानाच भविष्यात हे यश कायम राखीत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. लोणावळा शहर हे पर्यटनासाठी संपूर्ण देशात ओळखले जातेच पण त्यासोबत एक स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणूनही ओळखले जाऊ लागले असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.
नगराध्यक्षा जाधव यांनी राज्यपालांना एकविरा मातेची प्रतिमा भेट म्हणून दिली. यावेळी नगराध्यक्षा जाधव यांनी भविष्यात लोणावळा शहर आपली स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करेल असं सांगत राज्यपालांचे आभार मानले.

error: Content is protected !!