तळेगाव दाभाडे :
शहरातील विविध विकास कामांबाबतची आढावा बैठक नगरपरिषद सभागृहात संपन्न झाली. तळेगाव दाभाडे शहरातील प्रलंबित विषयांवर चर्चा झाली. नगरोत्थान, जिल्हा नियोजन समिती, दलित वस्ती सुधार योजना इ. योजनेंतर्गत तळेगाव दाभाडे शहरासाठी सुमारे ५६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केल्याची माहिती आमदार सुनिल शेळके यांनी या बैठकीत दिली
घनकचरा व्यवस्थापन, पाणी योजना, भुयारी गटर योजनेच्या कामांचा आढावा संबंधित ठेकेदार अधिकारी यांच्या उपस्थितीत घेतला. नियोजित वेळेत या दोन्ही योजना पूर्ण झाल्या तर शहराच्या विकासाला अधिक गती प्राप्त होईल. शहरात नागरिकीकरण वाढत आहे.परंतु अर्धवट राहिलेल्या योजनांमुळे पाण्याची समस्या निर्माण होऊन नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
तसेच वारंवार होणाऱ्या रस्ते खोदाईमुळे उपलब्ध असलेल्या निधीतील रस्त्यांची कामेही पूर्णत्वास नेण्यात अडचणी येत आहे. रस्त्यांची काही कामे सुरू झाली आहेत परंतु काही कामे अद्यापही सुरू झाली नाहीत. संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना ३० एप्रिलपर्यंत भुयारी गटर आणि पाणी योजनेची कामे पूर्ण करून रस्त्यांची कामे देखील पूर्ण करण्याची डेडलाईन दिली आहे.
तळेगाव-चाकण रस्त्यावरील विजेचे खांब स्थलांतरित करण्याच्या सूचना मागील वर्षापासून नगरपरिषदेला देत आहोत.परंतु याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. सर्वसामान्य विक्रेत्यांची गैरसोय ओळखुन संपुर्ण शहरात हॉकर्स झोन तयार करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.शहरात भविष्यात होणारे रस्ते हे डांबरी करण्याऐवजी कॉंक्रिटीकरण करण्यावर भर असणार आहे.त्यामुळे मजबूत व दिर्घकाल टिकणारे रस्ते तयार होतील. शहराचा विकास झाला पाहिजे ही एक प्रामाणिक भावना घेऊनच काम करीत आहोत. नगरपरिषदेत प्रशासक नियुक्त असल्याने आठवड्यातील एक दिवस स्वतः नगरपरिषदेत उपस्थित राहून कामकाजाचा आढावा व नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.
आमदार सुनिल शेळके,मुख्याधिकारी सतीश दिघे, नगरसेवक गणेश खांडगे,नगरसेवक गणेश काकडे, नगरसेवक किशोर भेगडे, नगरसेवक माने, नगरसेवक संदीप शेळके उपस्थित होते.

error: Content is protected !!