मावळमित्र न्यूज विशेष:
महाराष्ट्र शासनाने ६ जानेवारी  पत्रकार दिन घोषित केला आहे.आचार्य  बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त पत्रकार दिन घोषित केला आहे.बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
मराठी भाषेत गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. ६ जानेवारी  १८३२ रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढले.
इंग्रजी  सत्ताधार्‍यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.
वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते.
मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. १८३२ मध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र १९४९ पर्यंत चालले.
१८२५ साली आचार्य जांभेकरांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा मानसन्मान झाला होता.
मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकवताना, समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. त्यांना जाणवले की, केवळ महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही, तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले.आपले सहयोगी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.
वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ त्यांनी इ.स. १८४० साली सुरू केले.’दिग्दर्शन’ मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत.
आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘राष्ट्रजागृतीचे अग्रदूत’ म्हटले आहे. ६ जानेवारी, इ.स. १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने ६ जानेवारी हा आचार्य जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.

error: Content is protected !!