मावळमित्र न्यूज विशेष:
सातत्याने आलेल्या दु:खाला पाठीवर टाकून आपल्या भाच्यांसाठी आत्याने कंबर कसली आणि स्वतःच्या डोळ्याच्या कडा कधीच ओल्या न करता भाची आणि भाचे मंडळीचे अश्रू पुसून त्यांना रेघरूपाला आणलं.आपल्या जबाबदारीचे ओझे कधीच वाटलं नाही उलट हे आपले कर्तव्य मानून ही माऊली झिजली. कष्ट केले आणि एक सुसंस्कृत पिढी घडवली.
भाच्यांना वाढून वर्तून मोठे केलेच,पण नातवंडांना पतवंडानाही संस्काराची शिदोरी वाढून ठेवली. मावळ तालुक्याच्या पूर्व भागातील चांदखेड ऐतिहासिक गाव. येथील वारकरी संप्रदायातील.ह.भ.प. श्रीमती लीलाबाई हरिभाऊ देवकर असे या माऊलीचे नाव.चांदखेड गावाच्या समाजकारणातील आणि राजकारणातील बडे नाव,ज्येष्ठ नेते आदरणीय नारायण भाऊ जगन्नाथ गायकवाड,चांदखेड गावचे प्रसिद्ध दुग्ध व्यावसायिक पांडुरंग जगन्नाथ गायकवाड ,सौ. सिंधुबाई जयसिंग भोसले,सौ राधा गजानन कामठे यांच्या आत्या म्हणजे या
ह.भ.प. श्रीमती लिलाबाई हरिभाऊ देवकर .
लिलाबाई आत्या यांचा विवाह मुंढवा गावचे देवकर परिवारात लहान वयातच असताना झाला , मात्र काही काळातच पतीच्या निधनानंतर आत्या माहेरी आल्या.
हा दु:खाचा आघात असतानाच.
नियतीने दु:खाचा दुसरा घाला घातलाआणि चांदखेडला आल्यानंतर दुसऱ्या प्रचंड अशा धक्क्याला सामोरे जावे लागले तो धक्का म्हणजे आपला भाऊ जगन्नाथ गायकवाड आणि भावजय जनाबाई जगन्नाथ गायकवाड यांच्या अचानक पणे जाण्याचा.पतीच्या निधनानंतर भाऊ आणि भावजय यांच्या अचानक जाण्याने फार मोठ्या दु:खाचा डोंगर या आत्यावर कोसळला.
मात्र हे दु:ख कवटाळून बसण्याची ही वेळ नव्हती,चार लहान भाच्यांच्या संगोपनाची जबाबदारी आत्यांवर होती.
त्यामुळे या चारही लहान भाच्च्यांची सर्वस्वी जबाबदारी आत्याने समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलली
भावाचा असलेला दुग्ध व्यवसाय आत्याने हालाखीच्या परिस्थितीत समर्थपणे सांभाळला या वेळी कोणत्याही प्रकारची दळणवळणाची साधने नसताना आत्याने दुधाच्या घागरी आपल्या डोक्यावर घेऊन दररोज सहा किलोमीटर लांब असलेल्या बेबडओहळ या ठिकाणी पोहोचवत आपल्या लहान चार भाच्च्यांचे संगोपन केले.
त्याच बरोबर चांदखेड गावात होणार्‍या प्रत्येक धार्मिक कार्यात आणि भजनात आत्याने आवर्जून सहभाग घेतला तसेच चांदखेड गावांमध्ये पुरातन काळा मध्ये जे थोर संत होऊन गेले ते संत म्हणजे श्री संत रामजी बाबा आणि श्री समर्थ रघुनाथ बाबा त्यापैकी समर्थ रघुनाथ बाबांना या आत्याने जवळून पाहिले आहे त्यामुळे श्री समर्थ रघुनाथ बाबांना जवळून पाहणारी चांदखेड गावातील ही देवकर आत्या ही शेवटची व्यक्ती होती.अशा या कर्तबगार मायमाऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली.

error: Content is protected !!