मुंबई:
सरकारचा त्रास नको म्हणुन आम्ही आमची “ रोटी बॅक” चळवळच बंद करत आहोत असे मुंबई डबेवाला असोशिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी घोषित केले. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात तळेकर यांनी रोटी बॅक उपक्रम अधिका-यांच्या दडपशाहीला कंटाळून बंद करावा लागत असल्याचे स्पष्ट केले.
अन्न व प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांचे कडून सतत कोण ना कोण अधिकारी “रोटी बॅन्क” ला फोन करतात व तुमची “रोटी बॅन्क” ची नोंदणी आमचे कडे करा त्याचे लायसन घ्या हे करणे अनिवार्य आहे. अन्यथा तुमचेवर कारवाई होऊ शकते असे सांगतात.
सुभाष तळेकर म्हणाले “आमची महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की कारवाई करायला किंवा रजिस्टर व लायसन घेण्यासाठी “ रोटी बॅन्क” हा काही व्यवसाय नाही तर ती अन्न वाया जावू नये म्हणुन आम्ही चालवलेली चळवळ आहे.
●अन्नाची जागा नाही कचऱ्याची पेटी, कोणीतरी झोपत असेल उपाशी पोटी
आपण अन्न वाया घालवितो पण तेच अन्न कोणाचं तरी पोट भरु शकतं. हा एकदम साधा विचार आम्ही पाच वर्षा पुर्वी मांडला. जगाची एकूण लोकसंख्या ७०० कोटी आहे. त्यापैकी ११ टक्के लोक म्हणजेच ७९ कोटी ५० लाख लोक उपाशी आहेत. अमेरिका, इंडोनेशिया आणि ब्राझिल या जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या देशांच्या एकूण लोकसंख्ये एवढे लोक जगात उपाशी असतात.
यापैकी भारतात उपाशी राहणाऱ्यांची संख्या तब्बल १९ कोटी ५० लाख एवढी आहे. म्हणजेच २० लाख लोक आणखी मिळवून अख्खा पकिस्तान देश उपाशी राहील एवढी प्रचंड ही संख्या आहे. भारतात दररोज ३ हजार मुले कुपोषणाने मरतात.
मुंबईत या पेक्षा वेगळी स्थिती नाही. एका बाजुला नवकोट नारायणांच्या मोठ मोठ्या पार्ट्या,विवाह सोहळे होत होते या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात अतिरीक्त जेवण बनवले जाते. पार्टी संपली की मग हे अतिरीक्त जेवण कचर्याच्या डब्यात फेकुन दिले जात असे.हे चित्र एका बाजुला होते तर दुसर्या बाजुला याच मुंबईत उपाशी पोटी फुटपाथवर झोपणार्यांची संख्या लक्षणयरीत्या मोठी आहे.
काही ठिकाणी तर गरीब अनाथ मुले कचर्याच्या डब्यातुन ते अन्न वेचून खात असत. या परिस्थितीला बदलण्यासाठी मी व माझे सहकार्यांनी पुढाकार घेतला आणी अन्न वाया जावू नये म्हणुन चळवळ चालू केली त्या चळवळीला पत्रकारांनी “रोटी बॅंन्के” हे नाव दिले या चळवळीत आम्ही मुंबईकरांना (विषेशता दक्षिण मुंबई) आवाहन केले की आपल्या येथे अतिरीक्त अन्न शिल्लक रहात असेल तर ते अन्न फेकुन देऊ नका तुम्ही आम्हाला फोन करा.
फोन केल्या नंतर आमचा सहकारी आपल्या कडे सायकल वरून येईल व आपले अतिरीक्त जेवण घेउन जवळील भुकेल्यांना वाटील. अशा प्रकारे दररोज सरासरी शेकडो लोकांना अन्न वाटले जात आहे. भुकेल्यांची भूक भागविण्याचं स्तुत्य काम आम्ही गेली पाच वर्ष करत आहेत.या रोटीबॅन्केच्या माध्यमातुन पाच वर्षात १ कोटी रूपयाचे अन्न वाया जाण्या पासुन वाचवले गेले आहे.
परंतु आता महाराष्ट्र सरकार सांगते की तुम्ही “रोटी बॅन्के” ची नोंदणी करा व त्याचे लायसन घ्या, ना आम्ही जेवण बनवतो ना आम्ही जेवण विकतो.. मग नोंदणी कशाची करायची ? व लायसन कसले घ्यायचे ? या पुढे सरकारचा त्रास नको म्हणुन आम्ही आमची “ रोटी बॅन्क” चळवळच बंद करत आहोत.

error: Content is protected !!