मावळमित्र न्यूज विशेष:
नदीच्या दोन तीरांना होडीने गुंफणारा आणि येथून प्रवास करताना सुख दु:खाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेले चंदर रूपा बो-हाडे अनंतात विलीन झाले. पाण्यातील होडीवर ज्यांचं आयुष्य गेले ते चंदर आजोबा अनुभवांची खाण होती. गरीबीचे चटके सहन केलेले पण कष्टाला प्रयत्नांची जोड देऊन सुखी समृद्ध आयुष्य जगलेल्या चंदर बाबांच्या आयुष्यातील अनेक आठवणी गतकाळाला उजळणी देऊन गेल्या.
चंदर बोऱ्हाडे माळेगांव खुर्द येथील आदर्श व्यक्तिमत्त्व. शेतीबरोबरच अतिशय कष्टाचा शेळीपालन व्यवसाय त्यांनी केला.त्यांचे वडील रुपाजी बोऱ्हाडे यांनी ठोकळवाडी धरणप्रकल्पात माळेगांव ते वहाणगांव जलमार्गावर लाकडी होडीचे ‘नावाडी’ म्हणून होडीने ये-जा करणारांची हयात भर केली.
ऊन, वारा,पाऊस याची फिकीर न करता तळ्याकाठी गवताच्या खोपीत राहून रात्रंदिवस विनामूल्य मनोभावे सेवा केली.त्याकाळी ना रस्ते होते ना वहातुकीची सोय होती. पंचक्रोशीतील गावांचा सारा व्यवहार या होडीच्या मार्गाने होत होता.मग ते सकाळी वहाणगांव येथील दूध डेअरीला दूध पोहचवणे असो,गावोगावच्या यात्रा-जत्रा, उरुस असोत की लग्नसमारंभा निमित्त होणारा प्रवास असो.रुपाजी आजोबांच्या होडीनेच होत असे.
त्याकाळी वहाणगांव येथे वस्तीगृहयुक्त शाळा स्थापन करणारे शिक्षक-समाजसेवक आणि जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य कै.सावळेरामबाबा सुपे यांच्या दुकानातील मालाची वाहतूक देखील रुपाजी आजोबा यांच्या होडीनेच होत असे.कोणी देईल ते पैसे किंवा चटणीभाकरी खाऊन रुपाजी आजोबांनी समाजाची सेवा केली.
त्याकाळी आम्ही वडेश्वर आश्रम शाळेत शिकणाऱ्या मुलांची तर या रुपाजी आजोबांनी कधीच गैरसोय केली नाही.सांगायचं विशेष म्हणजे कधीही कसलीच दुर्घटना झालेली कोणाच्या ऐकीवात नाही.रुपाजी आजोबा यांच्या नंतर त्यांचा वारसा निसर्गवासी चंदरबाबा बोऱ्हाडे यांनी अतिशय जबाबदारीने सांबाळला त्यांना अतिशय तुटपुंजे मानधन मिळायचे.पण घेतला वसा टाकायचा नाही. या वृतीने ते जगले. आपली शेतीवाडीही त्यांनी अंगमेहनतीने केली.ते ग्रामदैवत भैरवनाथचे पुजारी होते.
चंदरबाबा आदिवासी रितीरिवाज, रुढी,चालीरीती, परंपरांनुसार जीवन जगले. गावात त्यांचे कोणाशी कधी भांडण-वाद नसत.”आपण भलं अन् आपलं काम भलं”असा चंदरबाबा यांचा स्वभाव होता.
वृध्दापकाळाने वयाच्या ८० वर्षी त्यांची प्राणज्योत अनंतात विलीन झाली.या बातमी ने अतिशय दु:ख झाले.निसर्गदेवता व ग्रामदेवता चंदरबाबांना आपल्या चरणी लीन करुन घ्यावे आणि समस्त बोऱ्हाडे परिवारास,आप्तेष्ट व गणगोत्रास हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना!
(शब्दांकन- बाजीराव सुपे सर, माळेगाव खुर्द )

error: Content is protected !!