वडगाव मावळ:
नगरपंचायत हद्दीत पंधरा हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोविड-१९ लसीकरण मोहीम राबविण्यात नगराध्यक्ष मयूर ढोरे यांचा सहभाग कौतुकास्पद आहे.
आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या प्रयत्नांतून मावळ तालुक्यात कोविड-१९ लसीकरणाचे उत्कृष्ठ कार्य सुरू असून आतापर्यंत जवळपास तीन लाख नागरिकांना लसीकरणचा लाभ मिळाला आहे.
वडगाव मावळ नगरपंचायतीच्या हद्दीत आज सुमारे पंधरा हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शासनाने दिलेल्या लसींचा नागरिकांना लाभ मिळावा याकामी नियोजनबद्ध पद्धतीने वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर प्रकाशराव ढोरे यांनी जातीने लक्ष घालून लसीकरणासाठी वैयक्तिक पातळीवर केलेला खर्च केला आहे.
त्यामुळे इतका मोठा टप्पा गाठणे शक्य झाले आहे.
वडगाव मावळ हे तालुक्याचे ठिकाण असल्याने अनेक शासकीय कार्यालये या ठिकाणी आहेत. याशिवाय न्यायालय, दवाखाने, बँका, बाजारपेठ आणि महामार्गावरील मुख्य गाव असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत असते.
सद्य परिस्थितीचा विचार करता कोविड-१९ लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविणे गरजेचे होते. देशभरातच या महामारीचे थैमान सुरू असल्याने शासकीय यंत्रणेवर ताण पडून म्हणावा तितका वेग येत नव्हता. अशावेळी नगराध्यक्ष म्हणून मयूर ढोरे यांनी दोन वर्षापूर्वी शहरातील महिला भगिनींसाठी मोफत नर्सिंग कोर्स प्रशिक्षण शिबिर राबविले होते.त्यातील २७ महिलांना कोरोना काळात आज वेगवेगळ्या हाॅस्पिटलमध्ये रोजगार उपलब्ध झाला असून त्यातील दोन महिला नर्सेस यांना या लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी करून घेतले.
विशेष म्हणजे सरकारी यंत्रणांच्या मर्यादा लक्षात घेता शहरातील लसीकरणाचा वेग अपेक्षित नव्हता. त्याकरिता आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन दोन नर्स व रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक लिपिक अशा तीन महिलांना या मोहिमेत सामावून घेतले आणि स्वतः पदरमोड करून मार्च महिन्यापासून वेतन उपलब्ध करून दिले.
त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्याबद्दल शहरातील अबाल वृद्धांकडून कौतुक होत असून लोक धन्यवाद देत आहेत. जवळपास गेल्या मार्च २०२१ पासून आज ऑक्टोबर अखेरपर्यंत लसीकरणासाठी या तीनही आरोग्य सेविकांचा भलामोठा मानधनाचा खर्च नगराध्यक्ष मयूर ढोरे करत आहेत .आणि जोपर्यंत वडगाव शहरातील शेवटच्या व्यक्तीचे लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत नागरिकांना सेवा देणाऱ्या या तीनही आरोग्य सेविकांचे मानधन देत राहणार आहेत असे सांगण्यात आले.
आमदार सुनिल आण्णा शेळके आणि सभापती बाबुराव वायकर यांच्या मार्गदर्शनाखालील या मोहीमेत शहरातील तळागाळातल्या लोकांचे लसीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हि मोहीम सुरुच राहिल असे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी सांगितले.
या लसीकरण मोहिमेमध्ये आमदार सुनिल शेळके, सभापती बाबुराव वायकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ चंद्रकांत लोहारे, तालुका समन्वय अधिकारी डॉ गुणेश बागडे, नगरपंचायत मुख्याधिकारी, उपकेंद्र येथील आरोग्य समन्वयक, डाॅक्टर, आशाताई सेविका, शहरातील सर्व डाॅक्टर, नर्सेस, नगरपंचायतील सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलिस प्रशासन, मेडिकल धारक, नागरिक आणि मित्रपरिवार या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याने वडगाव मावळची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे.

error: Content is protected !!