वडगाव मावळ :
मावळ तालुक्यातील शेतक-यांनी शासनाला भरभरून दिले पण त्या बळीराजाच्या पदरात काय पडेल असा प्रश्न बळीराजाची तिसरी पिढी आता विचारू लागली आहे. मावळात धरण झाली,त्यावर वीज निर्मिती झाली आणि मुंबई लखलखली.मावळात धरणे झाली आणि पिंपरी चिंचवडची तहान भागली. मावळात धरणे झाली आणि कारखानदारीला गती मिळाली. पण ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी धरणांसाठी संपादित झाल्या त्याच्या पदरी निराशाच आली.आता कुठे त्यांना आशेचा किरण दिसू लागला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोले तसे चाले असे आहे. एखाद्या प्रश्नावर तत्काळ रिजल्ट देण्याची त्यांचे खुबी आहे. काम होणार असेल तर होणार आणि नसले होणार तर नाही होणार अशी त्यांची स्पष्टोक्ती आहे.
याच अनुषंगाने मावळातील धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. याबैठकीत पवना व आंद्रा धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली.
पवना धरण प्रकल्पबाधित शेतकऱ्यांपैकी उर्वरित ८६३ शेतकऱ्यांचे पुनर्वसन करा, पवना बंद जलवाहिनी विरोधातील आंदोलनातील गोळीबारात जखमी झालेल्या १२ जखमी शेतकऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नोकरीत सामावूनघ्या, शिरे – शेटेवाडी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देणे व पुनर्वसन वसाहतीमध्ये मुलभुत सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात अशा या धरणग्रस्तांच्या मागणीवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद देत याबाबतची सविस्तर माहिती घेऊन अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
पुण्याचे जिल्हाधिकारी या अनुषंगाने तातडीने अहवाल सादर करून हा प्रश्न तातडीने मार्गी लागले असा आशावाद धरणग्रस्त शेतकरी बांधवाना आहे. आमदार सुनिल शेळके व धरणग्रस्त संयुक्त समितीचे पदाधिकारी व सदस्य आणि संबंधित विभागाचे आधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
मावळ तालुक्यातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन व इत्तर प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून ते मार्गी लावण्यासाठी आमदार सुनिल शेळके शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी आमदार शेळके यांनी १० जुलै रोजी पवना धरणाजवळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसमवेत आंदोलन देखील केले होते. मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने धरणग्रस्तांना दिलासा मिळाला आहे, या सर्व घटनाक्रम पाहता,हा प्रश्न दिवाळी पूर्वी मार्गी लावून धरणग्रस्तांची यंदाची दिवाळी अधिक गोड होईल असा विश्वास धरणग्रस्त शेतकरी बांधवांना आहे.

error: Content is protected !!