मुंबई:
दोन वर्षांपूर्वी शरद पवार साहेबांना ईडीची नोटीस आली आणि ईडीला आव्हान देत, मीच भेटायला येतो असा इशारा पवार साहेबांनी दिला. राज्य व देशभरातील वातावरण ढवळून निघाले होते. या देशात सूडाचं राजकारण सुरू आहे , त्याचाच हा भाग होता. पवार साहेबांचा त्या प्रकरणाशी संबंध नव्हता. त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करायचे हे कुटील कारस्थान होते. दिल्लीच्या तख्त़ाने पवार साहेबांना नमवण्याचा प्रयत्न केला .परंतु दिल्लीच्या तख्त़ासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवार साहेबांनी दाखवून दिले.
ही घटना लोकांच्या मनात इतकी खोलवर बसली की आज आपण महाराष्ट्रात सत्तेत आहोत, याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करुन दिली. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या जालना जिल्हयातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा त्यांनी आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते.
पवार साहेबांच्या किमयेने व दूरदृष्टीने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. आणि त्यात राजेश टोपे मंत्री झाले आणि आरोग्य मंत्री म्हणून त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. कोरोना काळात चांगले काम न केल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना काढून टाकण्यात आले .परंतु महाराष्ट्राचा हा आरोग्यमंत्री जगात आपल्या कामाने मोठा झाला. मूर्ती लहान पण किर्ती महान असे राजेश टोपे यांचे काम आहे, असे गौरवोद्गार यावेळी जयंत पाटील यांनी काढले.
सरकार आल्यावर संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या कामांना प्राधान्य देता येते. दिवस हे बदलत असतात. आज आपली सत्ता आली आहे. या नेत्यामुळे तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. त्यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
पक्षाची मरगळ झटकून टाकावी या उद्देशाने ही परिवार संवाद यात्रा काढण्यात आली आहे. पायाला भिंगरी लावून २८८ मतदारसंघात जयंत पाटील जात आहेत आणि जाणार आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
घनसावंगीच्या पदाधिकार्‍यांनी शंभर टक्के बुथ कमिट्या तयार केल्या आहेत. यापुढे आमदार कार्यालयातून नाही तर बुथ कमिट्यांच्या माध्यमातून कामे होतील, असा शब्द यावेळी राजेश टोपे यांनी दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पैकीच्या पैकी जागा निवडून आणल्या पाहिजेत, असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले.
यावेळी मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळंके, जालना जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, माजी आमदार अरविंद चव्हाण, समर्थ साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन उत्तममामा पवार, महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा लहाने, मराठवाडा समन्वयक प्रज्ञाताई खोसरे, घनसावंगी तालुकाध्यक्ष नंदकुमार देशमुख, जालना ग्रामीण अध्यक्षा सीमा देशमुख, महिला तालुकाध्यक्षा वंदना पवार, महिला निरीक्षक वैशाली पाटील, युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!