तळेगाव दाभाडे:
एका दुचाकीवर दोन ते तीन वेळा बिलिंग करून आरटीओच्या पावत्यांत खाडाखोड करून ,खोटे नंबर टाकून वाहनांची परस्पर विक्री करणा-या शोरूम व्यवस्थापकाने २६ लाख ५९ हजारांची माया जमवली.त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
३१ मार्च २०१७ ते १६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत तळेगाव दाभाडे येथील खांडगे ऑटोमोबाईल येथे ही फसवणूक झाली. सिद्धार्थ सतीश दळवी (वय 30, रा. विद्याविहार कॉलनी, तळेगाव दाभाडे) या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश वसंतराव खांडगे
(वय ५० रा. तळेगाव दाभाडे) यांनी गुरुवारी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांडगे यांचे
तळेगाव दाभाडे येथे खांडगे ऑटोमोबाईल नावाचे
दुचाकी वाहनांचे शोरूम आहे. आरोपी सिद्धार्थ हा त्या
शोरूम मध्ये मागील काही वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून
काम करत होता. फिर्यादी खांडगे यांनी शोरूमचे सर्व
व्यवहार आणि इतर बाबी विश्वासाने सिद्धार्थवर
सोपवल्या होत्या.
सिद्धार्थ याने एकाच दुचाकी वाहनाचे दोन ते तीन वेळा
बिलिंग करून आरटीओच्या रजिस्ट्रेशनच्या पावत्यांमध्ये
खाडाखोड केली. त्यावर खोटे व चुकीचे नंबर टाकून ते
नंबर खरे असल्याचे ग्राहकांना भासवून दुचाकी
वाहनांची परस्पर विक्री केली. त्याबदल्यास
ग्राहकांकडून आणि सब डीलरकडून तब्बल २६ लाख
५९ हजार २३५ रुपये घेऊन फिर्यादी यांचा विश्वासघात
केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून
तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

error: Content is protected !!