मावळमित्र न्यूज विशेष:
सर्वसामान्य कुटूंबा प्रमाणे आमचं कुटूंब आपुलकी,प्रेम,जिव्हाळा आणि ऐकामेका प्रती आदर हेच आमचं बळ. आमच्या कुटुंबियांसाठी खस्ता खाल्लेल्या,रात्रंदिवस काबाडकष्ट करून आम्हा सर्वाना स्वाभिमानाची शिकवण देणारे माझे पप्पा आमचं आयडाॅल आहे.
माझे पप्पा दतात्रय गोधू शिंदे साते ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच,मावळ तालुका खरेदी विक्रीचे संचालक.
त्याच्या कष्टाला,धैर्याला, हजरजबाबीपणाला,व्यवहारचातुर्यला, आणि सगळ्यात महत्वाचे आमच्या आख्ख्या कुटूंबाला एका धाग्यात घट्ट गुंफून विणून ठेवणा-या पप्पांच्या सुस्वभावीपणाचे गुण आमचे आदर्श आहे. आज पप्पांचा वाढदिवस. त्याच्या आयुष्यातील अनेक चढउतार,सुख दु:खाचा मागोवा घेणारा हा दिवस.आमच्या पप्पांनी खूप खूप गरीबी अनुभवली. पप्पा आमचे आयडाॅल असेल तरी पप्पांचा आदर्श आमची आजी,पप्पांची आई आहे.
माझे चुलते तीन महिन्याचे असताना गोधू शिंदे माझे आजोबा यांचे निधन झाले. चार लेकरांचे संगोपन ही माझी आजी गऊबाई हिच्या पुढेचे मोठे मोठे आव्हान तिने पेलायला सुरूवात केली. माझे पप्पा सर्वात मोठे त्यांनी आजीच्या हातात हात धरून कष्टाला सुरूवात केली. कष्टाला काही परिसीमा नसते. घामाच्या जोरावर यशाचे शिवार फुलवता येते हे साधे गणित या मायलेकांना होते.
म्हणून त्यांनी कष्टाचे पहिले पाऊल टाकले आणि याच पावलावर पाऊल टाकून चुलते सिताराम गोधू शिंदे,अनंता गोधू शिंदे,रामदास गोधू शिंदे यांनीही कष्टाला आपले केले. गावोगावच्या यात्राजत्रेत शिंदे भाऊ आईस्क्रीम,फळ,पेरू,चिंचा विकू लागले. पप्पा तर ईगल कंपनीत आठ तास काम करायचे आणि उरलेल्या वेळेत आईस्क्रीम,गारीगार,पेरू,बोरं,चिंचा विकायचे. तिन्ही मावळातील यात्राजत्रेत सुरूवातीला त्यांची सायकल आणि त्यानंतर एम ८० गाडीवरून त्यांचा प्रवास सुरू राहिला.
फार कमी वयात पप्पांचे लग्न झाले. माझी आई अलका आंदर मावळातील घाटेवाडीच्या चिंधू खांडभोर यांची कन्या तीही पप्पांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.पप्पा नोकरी करायचे,माझे तीनही चुलते पप्पा सांगितले ते करायचे. परिणामी आमची परिस्थिती बदलू लागली होती. बदलत्या परिस्थितीला माझी आजी,आई,आणि सगळ्या चुलत्या यांनी साथ दिली. हाताने काम आणि मुखाने राम नाम हे आमच्या जगण्याचा मार्ग ठरला.
ईगल बंद पडली,पप्पांना फळे,आईस्क्रीम विक्री सूरूच होती.याच दरम्यान वडगाव फाट्यावर ज्योतिर्लिंग हाॅटेल भाड्याने घेऊन हा नवा व्यवसाय त्यांनी सूरू केला. कान्हे फाटा कामशेत रस्त्याला गोकुळ हाॅटेल सुरू केले.
घरातील माणसे राबू लागली. आम्ही भावंडे मोठी होत होत होतो. अजय चा जन्म झाला आणि आमच्या कुटूबियांनी अजय ढाबा सूरू केला. आता आमच्या अजय च्या दोन शाखा झाल्या. आम्ही भावंडे मोठी होत होतो. आमचे शिक्षण सूरू होते. मी पदवी घेतली.
पप्पांना सुरूवातीला ग्रामपंचायत निवडणुकीत अपयश आले. दुस-यांदा संधी मिळाली. ते साते ग्रामपंचायतीचे उपसरपंच झाले. पूढे खरेदी विक्री संघाचे संचालक झाले.
गरिबीच्या झळा सोसलेल्या,बालवयात वडीलांचे छत्र हरपलेल्या माझ्या पप्पांना त्यांच्या आईने दिलेल्या शिकवणीतून मोठे झाले. यशस्वी झाले. आम्हा बहिणीची लग्न झाली. आमचे प्रपंच उत्तम आणि सुखा समाधानात आहे. लेकीचे सुख,बहिणीचा आनंद,आईची प्रेमळ छाया आणि पत्नीची अखंड सोबत यापेक्षा अधिक सुख समाधानात कशात असले तर ते पद,प्रतिष्ठा आणि मानसन्मानात. माझ्या पप्पांना हे सगळे मिळाले ते आज सुखी,समाधानी आहेत.
आज त्याच्या चेहर्‍यावर सुखाची स्माईल दिसते. आज एसी कार मध्ये त्याचा प्रवास सुरू आहे. आज चार जणांच्या हाताला त्यांनी काम दिले. आज तेही गावकारभारात आहे. आणि चुलतेही ग्रामपंचायतीत निवडून आले आहे. आज सारी सुखे त्याच्या पायाशी लोळण घेत असली तरी कधीकाळी ते अनवाणी चालत गेले.
ऊन,वारा,पावसात त्यांनी सायकल चालवली,टूव्हिलरवर प्रवास केला आहे. एक एक यशाचा धागा मिळवण्यासाठी वाट पाहिली. संयम ठेवला. धीर धरला. कष्ट केले. सा-या परिवाराला कामात गुंतून ठेवले. त्यासाठी कष्टात गुंतून ठेवले. बियाणे स्वतः जमिनीत रुजल्या शिवाय त्याचा वृक्ष होत नाही. त्या परीस पप्पांनी स्वतःला गाडून घेतले. त्यांच्या आयुष्यात सुखाच्या सोबतीने दु:खाच्या काही लाटा आल्या.पण या भल्या माणसांनी या लाटा जशाच्या तशाच्या परतावून लावल्या.
आजचे यश,आजची प्रतिष्ठा,मानसन्मान ही आमच्या कुटूंबातील सामूहिक शक्तीचे यश आहे. सामूहिक एकतेचे ते फळ आहे.या सर्वाचा केंद्रबिंदू पप्पा आमचे आयडाॅल आहे. हे सगळे शब्द रूपाने माझे मत असले तरी हे आम्हा भावंडांचे आमच्या संपूर्ण कुटुंबाचे पप्पा बद्दलचे आदराचे बोल आहे. पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
(शब्दांकन- पूनम अतुल वायकर,वडगाव मावळ)

error: Content is protected !!