वडगाव मावळ :
मावळ मतदारसंघात गुरुवार
(दि.२ सप्टेंबर) पासून महाराजस्व अभियानांतर्गत व आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातुन मावळ विधानसभा मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा उपक्रम पुढील दोन महिन्यांपर्यंत चालणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातुन शासनाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्येक गावात जाऊन गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार आहेत.
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व त्यासाठी लागणारे दाखले मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयात अनेक दिवस हेलपाटे मारावे लागतात. अशा योजनांचा लाभ त्यांना त्यांच्या गावातच मिळवून देण्यासाठी गावा-गावात शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्याचा संकल्प आमदार सुनिल शेळके यांनी केला आहे.
या उपक्रमामुळे मावळ मतदार संघातील दुर्गम भागातील गावांमधील नागरिकांपर्यंत शासकीय योजना व मुलभुत शासकीय दाखले पोहचविणे शक्य होणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील कोणीही गरजू व पात्र नागरिक शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही. व त्यांच्या विकासासाठी निर्माण केलेल्या योजनांचा त्यांना सहज लाभ घेता येणार आहे.
शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत शासकीय यंत्रणा मावळ मतदार संघातील प्रत्येक गावा-गावात जाऊन तेथील नागरिकांना नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड दुरुस्ती करणे, नवीन रेशनकार्डचे अर्ज स्वीकारणे, रेशनकार्ड दुरुस्ती व जीर्ण रेशनकार्ड बदलून देणे, सामाजिक विशेष सहाय्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, विधवा,अपंग व राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, नवीन मतदार नोंदणी व नाव दुरुस्ती करणे, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, पंतप्रधान आवास योजना(ग्रामीण), शबरी आवास योजना,रमाई आवास योजना, ७/१२ वरील नोंदी व दुरुस्ती अर्ज स्वीकृती, नवीन वीज कनेक्शन (घरगुती), पंतप्रधान मातृ वंदना योजना, शेती पंप वीज कनेक्शन अर्ज स्वीकृती व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना इत्यादी अनेक शासकीय योजनांचा गरजू व पात्र नागरिकांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
शासन आपल्या दारी या अभियानाची सुरुवात मावळातील ग्रामीण व दुर्गम भागातुन करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (दि.२, सप्टेंबर) नाणे मावळातील शिरदे, उकसान, गोवित्री, करंजगाव या चार गावांमध्ये हे अभियान सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेत राबविण्यात येणार आहे.
आमदार सुनिल शेळके : शासकीय योजनांपासून ग्रामीण भागातील गरजू व वंचित असणाऱ्या पात्र नागरिकांसाठी महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत असून या माध्यमातुन प्रत्येक गावात शासकीय यंत्रणा नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी उपलब्ध होणार आहे, तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन आमदार शेळके यांनी केले आहे.

error: Content is protected !!