तळेगाव दाभाडे:
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा बरोबरच तळेगाव दाभाडे येथील ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर देखील अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे, ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. आतापर्यंत समाजाला विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान विद्यार्थी देणाऱ्या या शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी घोषणा नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव व परांजपे विद्या मंदिरच्या शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी केली.
नूतन विद्या मंदिर या नावाने स्थापन झालेल्या आणि पुढे ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर असे नामकरण झालेल्या या शाळेच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ शाळेचे माजी विद्यार्थ्यी व तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक चंद्रकांत काकडे व शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नारळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी शेलार बोलत होते.
कार्यक्रमास नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक सोनबा गोपाळे, वसंत भेगडे,माजी अध्यापक शंकर नारखेडे,प्रा वसंत पवार, माजी मुख्याध्यापक इरावती केतकर, श्रीकृष्ण मुळे,उद्योजक अमर ढालपे आदी मान्यवरांसह शाळेचे आजी- माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सोनबा गोपाळे गुरूजी म्हणाले,” शाळेतून मिळालेल्या संस्कारातून तालुक्याला दिशा देणारे विद्यार्थी या शाळेने निर्माण केले. अशीच परंपरा पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी शाळेतील शिक्षकांवर राहील. तसेच वृक्षारोपण व पर्यावरण संतुलनाचे काम पुढील काळात होणे गरजेचे आहे.
वसंतराव भेगडे म्हणाले ,”ज्या काळात मुलींना शिक्षण देण्याची गरज होती, अशावेळी कै. दादासाहेब केतकर यांनी मुलींच्या घरोघर जाऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले.
महाराष्ट्रातील एकूण शैक्षणिक चळवळ व सद्यस्थितीतील शैक्षणिक विचार मंथन या संदर्भात राज्यातील ख्यातनाम शिक्षण तज्ञ, विचारवंत यांना आमंत्रित करून चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजित करावी असे भेगडे यांनी सुचविले.
चंद्रकांत काकडे , प्रा. वसंत पवार, इरावती केतकर, श्रीकृष्ण मुळे, मालती वाळुंज, सुरेखा गंभीर, रमेश जाधव आदि शिक्षकांनी आपल्या भाषणात व्याख्यानमाला, ऑनलाईन उपक्रम, सांस्कृतिक, नाट्य, संगीत, विज्ञान व ग्रंथ प्रदर्शन, विविध स्पर्धांचे आयोजन करावे असे उपक्रम सुचविले.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. प्रास्ताविक दुर्गा भेगडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती बारमुख यांनी केले. पांडुरंग पोटे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!