वडगाव मावळ:
स्व.वसंतराव नाईक यांचा जन्म दिन कृषीदिन मावळ तालुक्यातील डाहुली ग्रामपंचायती बोरवली येथे साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली व कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव आप्पा वायकर, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशा नुसार हा कार्यक्रम ग्रामीण भागात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. शेती आधुनिक पद्धतीने कशी करता येईल याबाबत शेतक-यांनी प्रयत्न करण्याचे सुचवले.
कृषी शास्त्रज्ञांनी जे ज्ञान दिले ते शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचेल याबाबत प्रयत्न करावेत,सर्व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.
कृषी समितीचे सभापती बाबुराव वायकर यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत राबवत असलेल्या योजना बद्दल माहिती दिली. यापुढे ही शेतकऱ्यांना उपयोगी ठरतील अशा नवनवीन योजना कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत राबविणार असल्याची माहिती दिली.
अॅग्रो अंबुलन्स तसेच माती परीक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत कृषी विज्ञान केंद्र बारामती व नारायणगाव यांना दिलेल्या गाड्यांमुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शास्त्रज्ञ त्यांना मार्गदर्शन करत आहेत .त्याचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन सभापती वायकर यांनी केले. यांत्रिकीकरणावर भातशेती साठी लागणारे अवजारे ही यावर्षी योजनेमध्ये घेणार असल्याचे सुतोवाच वायकर यांनी केले.
याचा लाभ मावळ तालुक्याला जास्तीत जास्त लाभ कसा देण्यात येईल याबाबत प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी शेतकऱ्यांनी भाताबरोबरच इतर पिकांची ही माहिती घेऊन ज्यामध्ये आर्थिक फायदा जास्त होईल असे पिकांची निवड करण्याचे आवाहन केले. आपल्या पिकावरील खर्च कमी करून जास्त उत्पन्न कसे हातात पडेल,याबाबत शेतकऱ्यांना प्रयत्न करण्यास सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोटे यांनी मावळ हा फुलशेतीचे आगर असल्याचे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती मावळ तालुक्यातील बहुतांश लोक करत आहे, याबाबत समाधान व्यक्त केले. उत्पादित केलेल्या मालाला जास्तीत जास्त दर कसा मिळेल याबाबत प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे.
संघटित होऊन गटशेती केल्यास अधिक चा फायदा होईल असेही त्यांनी सांगितले.
कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख यांनी भात उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञान यंत्रावर भात लागवड त्यातून होणारी किफायतशीर शेती याबाबत मार्गदर्शन केले. भात संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉक्टर नरेंद्र काशीद यांनी भाताची चारसूत्री लागवड तसेच भाताच्या नवनवीन जाती याबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. इंद्रायणी बरोबरच फुले समृद्धी चा ही जास्तीत जास्त लागवड करण्यास सांगितले.
बबन शंकर खांडभोर यांचा जिल्हास्तरीय पीक स्पर्धेत दुसरा नंबर आल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वृक्षारोपण चारसूत्री भात लागवड याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. तसेच कृषी संजीवनी सप्ताह निमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांचे भाषण दृकश्राव्य माध्यमाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. सदर कार्यक्रमास कृषी समितीचे सदस्य लक्ष्मण सातपुते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत ,सहाय्यक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे ,तालुका पशुसंवर्धन अधिकारी अंकुश देशपांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन डाहुली ग्रामपंचायतचे सरपंच नामदेवराव शेलार सर्व सदस्य ग्रामस्थ, पंचायत समिती मावळ, राज्य शासनाचा कृषी विभाग व कृषी संशोधन केंद्र वडगाव मावळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले.

error: Content is protected !!