
निसर्गरम्य आंदर मावळ..सह्याद्रीचे उंच …उंच डोंगर…सोबतीला वृक्षवेली…यांच्याशी मैत्री असणारे… लहानस खेडं … कुसवली .राहण्याची पारंपरिक पद्धत. तीच जगण्याची रीत अन जीवनशैली.. पिढ्यानपिढ्या डोंगरखोऱ्यात घालवून वास्तव्यास असलेले बांधव. पडकई इर्जिक करून केलेली शेती.
शेती हाच आख्यया गावचा मुख्य व्यवसाय. सोबतीला दूधधंदा यांवरच उदरनिर्वाह करणाऱ्या श्री दत्तोबा चिमटे व त्यांच्या सौ. लिलाबाई चिमटे यांच्यापोटी दुसरे अपत्य पुत्ररत्न जन्माला आले त्याचे नाव अंकुश.सुखा -समाधानाचा संसार सुरू होता.श्री दत्तोबा मामा चिमटे गावचे कारभारी. सामाजिक कार्याची त्यांना आवड.ही आवड पाहून गावातील लोकांनी त्यांना ग्रामपंचायतीला सदस्य पदी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. यातून ते पुढे गावचे सरपंच पदावर विराजमान झाले. समाजाबरोबर गावाचा देखील विकास होत होता. लहानसा अंकुश वडिलांचे हे सामाजिक काम पाहत होता. कळत नकळत त्याच्या मनावर सामाजिक कार्याचे संस्कार आणि बाळकडू आपसूक बिंबत होते. अंकुशच्या मनावर सामाजिक कार्याचा सकारात्मक परिणाम दिसत होता.
याच काळात त्याचे शालेय शिक्षणही सुरु होते. लहान वयातच संघटनकौशल्य व नेतृत्वाची चुणूक अंकुशने शाळा पातळीवर होणाऱ्या स्पर्धांमध्ये दाखवली होती. शिक्षण पूर्ण करून अंकुश पुन्हा कुसवलीला आला.वडील आणि भावांना शेतीकामात मदत करू लागला. पण सामाजिक कार्याचा पिंड त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. गावाबरोबर समाजाचा विकास, समाजाला सन्मानाची वागणूक इत्यादी या गोष्टी अंकुशला खुणावू लागल्या.अंकुश आता पूर्णवेळ सामाजिक कामात सहभागी होऊ लागला. दोनाचे चार हात झाले.सांसारिक जीवन सुरु झाले पण सामाजिक काम मात्र थांबले नाही. अविरत, अखंडित,अविश्रांतपणे ते सुरुच होते.
अंकुशच्या सामाजिक कामाची दखल कुसवलीकरांनी घेतली.अंकूशची निवड ग्रामपंचायत सदस्यपदी केली. अंकुशराव यांच्या कारकिर्दीला खरा बहार आला तो येथूनच… विविध शासकीय योजना, आदिवासी विकास योजना, घरकुल योजना, अंतर्गत रस्ते, गटार योजना इत्यादी योजना गावात अत्यंत प्रभावीपणे राबविल्या गेल्या.कडूबाई मंदिराचा केलेला जीर्णोद्धार सर्व गावकऱ्यांनी पाहिला.
सारे गाव आनंदून गेले.याच कामाची पावती म्हणून अंकुशराव यांना दुसऱ्यांदा ग्रामपंचायतीवर काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. कोरोना काळात देखील अंकुशराव यांची विकासकामांसाठी धडपड सुरूच होती.आदिवासी समाज्याच्या विकासासाठी ‘बिरसा क्रांती दलाच्या’ अध्यक्ष पदावरून काम करत असताना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी केलेले उल्लेखनीय काम यातून आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी कायम अंकुशराव प्रयत्न करत होते हेच दिसून येते. परंतू दुर्दैवाने अचानकपणे एका अल्पशः आजाराने अंकुशरावांची प्राणज्योत मालवली.
गोरगरीबांच्या दुःखावर अंकूश ठेवण्यासाठी झटणारा अंकूश अचानक निघून गेला.आदिवासी,कष्टकरी,गरीब वर्गातील लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता निःशब्द झाला.ग्रामपंचायत सदस्य पदावरून देखील विकास कामे करता येतात हे दाखवून देणारा हा ‘ जननायक’ हरपल्याची भावना कायम पंचक्रोशीतील जनता व समाजाच्या मनात राहील.वडिलांकडून आलेला संयम आणि समयसुचकतेचा वसा आणि वारसा अंकुश चा मुलगा आकाश जपली याची शाश्वती आहे.
फार कमी वयात आकाशवर वडिलांचा मृत्यू आलेले हे दु:ख त्याने तळेगावच्या हरणेश्वर रूग्णालयाच्या दारात फार संयमाने घेतले. आई, आजी , आत्या आणि अंथरूणावर पडलेले आजोबा दत्तोबा चिमटे यांना ही दु:खाची घटना तातडीने समजू नये म्हणून लहानसा आकाश धावाधाव करीत होता. तेथूनच तो आधाराचे चार शब्द बोलत होता.
खर तर अंकुश ची मैत्री निखळ होती, या मैत्रीचा धागा तुटला याचे दु: ख त्याच्या समस्त मित्र परिवाराला चटका लावून जाणारं आहे.
(शब्दांकन -राजू वाडेकर, सर)
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


