वडगाव मावळ:
सोमाटणे टोलनाक्यावर स्थानिकांना थांबवून होणारी टोलवसुली तात्काळ थांबवा अशी मागणी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी केली आहे.
आवारे यांनी ज्येष्ठ विधीतज्ञ प्रविण वाटेगावकर यांच्या मार्फत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्याचे मुख्य सचिव, रस्ते विकास महामंडळ व आयआरबी यांना नोटीस पाठवली आहे.
मावळ तालुक्यातील सर्व वाहनांना टोलनाक्यावर सुट मिळावी, याकरिता २१ फेब्रुवारीला टोलनाक्यावर सर्वपक्षीय आंदोलन होते. पोलीस प्रशासनाने कोविड काळात आंदोलन न करता चर्चेतून विषय सोडविण्याची विनंती केली होती. यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत एमएसआरडीसीचे अधिकारी दिलीप शंकरराव व आयआरबीचे अधिकारी वामनराव राठोड यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक झाली.
याबैठकीत मावळातील स्थानिकांसाठी सोमाटणे टोलनाका टोलमुक्त करण्याचा निर्णय झाला. महिनाभर या निर्णयाप्रमाणे स्थानिकांना प्रत्यक्ष टोलमाफी देण्यात आली. मार्च नंतर मात्र पुन्हा स्थानिकांना टोलसाठी आडवणूक सुरू झाली. लोणावळा, वरसोली, तळेगाव भागातील अनेक नागरिकांच्या तक्रारी जनसेवा विकास समितीकडे येऊ लागल्या. टोलमाफीचा जीआर आला नसल्याने वसुली पुन्हा सुरू केली असल्याचे याठिकाणी सांगितले जात आहे.
वास्तविक पाहता दोन टोल नाक्यांमधील अंतर ३५ किमी पेक्षा जास्त असावे असा नियम असताना वरसोली व सोमाटणे हे टोलनाके ३० किमी अंतराच्या आतमध्ये येत असल्याने यापैकी एक टोलनाका बेकायदेशीर आहे. मागील १५ वर्ष मावळातील नागरिकांची फसवणूक करत या ठिकाणी राजरोसपणे टोलवसुली सुरू होती, असा आरोप किशोर आवारे यांनी केला आहे.
सोमाटणे येथील सदर बेकायदेशीर टोलनाका देहुरोडच्या पुढे हालवावा अशी मागणी आवारे यांनी केली आहे.
सोमाटणे टोलनाक्यावरील वसुली थांबवावी, अंतरिम दिलासा म्हणून हलक्या वाहनांना टोलमधून माफी द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!