
वडगाव मावळ:
पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि सात जन्म हाच पती मिळावा असे साकडे घालून मावळ तालुक्यातील सुवासिनी महिलांनी वडाची पूजा करून वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली.
वादविवादात यमाला हरवून पतीचे प्राण परत मिळवणार्या सावित्रीच्या पतीव्रतेचे प्रतीक म्हणून वटपौर्णिमा व्रत केले जाते. सावित्री आणि यम यांची चर्चा वटवृक्षाखाली झाल्यामुळे वटवृक्षाला महती प्राप्त झाली आहे.
●वटपौर्णिमा चे महत्व
जुन्या काळात भद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता. त्याला सावित्री नावाची अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि तेजस्वी मुलगी होती. सुंदर, बुद्धिमान मुलीशी लग्न करायला कोणी तयार नाही .म्हणून तिच्या वडिलांना चिंता वाटू लागते. त्यामुळे राजाने सावित्री मोठी झाल्यानंतर तिला तिचा पती निवडण्याची परवानगी दिली.
सावित्री शाल्व राज्याच्या धुमत्सेन नावाच्या अंध राजाच्या मुलाशी म्हणजेच राजकुमार सत्यवान याची आपला पती म्हणून निवड करते. राजा धुमत्सेन शत्रूकडून हरतो. राणी व मुलगा सत्यवान यांसह राजा जंगलात राहायला जातो. भगवान नारद सावित्रीला सत्यवानाचे आयुष्य केवळ एका वर्षाचे राहिले असल्याचे सांगतो.
त्यामुळे नारद सावित्री ला लग्न करू नको असा सल्ला देतो. पण सावित्री ते मान्य न करता सत्यवानाशी विवाह करते. जंगलात नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करत असेच दिवस जात असतात. सत्यवानाचा मृत्यू जवळ येत होता. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर आला होता .
तेव्हा सावित्री ने तीन दिवस उपवास करून व्रत केले. मृत्यूच्या दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास गेला, त्याबरोबर सावित्री सुद्धा लाकडे गोळा करण्या गेली. लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आली व तो जमिनीवर पडून त्याचा मृत्यू झाला. यमदेव येऊन सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागला. यमदेव सत्यवानाचे प्राण घेऊन जात असताना सावित्री यामाशी वास्तविक स्वरूपाविषयी चर्चा करू करते.
आणि यमाला सत्यवान जिवंत राहणे का गरजेचे आहे हे समजावून सांगते. अंध वडिलांचा एकच मुलगा म्हणून सत्यवान जिवंत असणे गरजेचे असते. अत्यंत सुस्पष्ट, तर्कसुसंगत, तत्त्ववेत्त्यांनाही मागे टाकेल अशा बोलण्याने सावित्रीने आपल्या पतीला यमाकडून सोडवून घेतले.
यमाने सत्यवान ला सोडून दिले आणि सावित्रीला तीन वर मागण्यास सांगितले.
सावित्रीने सर्वप्रथम आपल्या सासूसासऱ्याचे डोळे मागितले. दुसऱ्या वर मध्ये हरलेले राज्य परत मागितले. तिसरा वर आपल्याला पुत्र व्हावा असा मागितला. यमराजाने तिन्ही वर मान्य करत सावित्रीने मागितलेले वर खरे झाले. सत्यवान परत आला होता. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली यमदेवाकडून परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. यादिवशी स्त्रिया उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरन करतात.
भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते,अशीही आख्यायिका आहे.
●वटपौर्णिमेला अशी केली जाते पूजा :
हिरव्या बांगड्या, शेंदूर, एक गळसरी (काळी पोत), अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहू, सती मातेचा फोटो किंवा सुपारी इ.
● वटपौर्णिमा पूजन
सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा. स्त्रियांनी या दिवशी पूजा करेपर्यंत उपवास करावा. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी.
नंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे.
हळदी-कुंकू, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे. वडाचे मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी. वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा (गोड पोळी) नैवेद्य दाखवावा. वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालून
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
अशी सावित्रीची प्रार्थना म्हणली जाते.
वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।। असे म्हणून नामस्मरण केले जाते.



