
वडगाव मावळ:
मावळ तालुक्याच्या विनाअनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना फी मध्ये पस्तीस टक्के सवलत मिळणार आहे. मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत पालक,संस्थाचालक यांच्या एकमत होऊन हा निर्णय घेण्यात आला.आमदार सुनिल शेळके यांनी पस्तीस टक्क्यातील पाच टक्के फी चा बोजा उचलण्याचे जाहीर केले.
मावळातील सुमारे चौदा हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार सुनिल शेळके,आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पंचायत समितीचे प्रभारी सभापती दत्तात्रय शेवाळे,गटविकास अधिकारी सुधीर भागवत,गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे,उपस्थित होते.
या बैठकीत पालक आणि संस्थाचालकांनी आपले म्हणणे मांडले. कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण चालू असलेल्याचे संस्थाचालकांनी सांगितले. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना फी भरण्याचा तगादा लावलेला असून फी मध्ये सवलत द्यावी. अशी मागणी पालकांकडून होत होती.
त्यामुळे पालक व संस्थाचालक यांच्या मध्ये संघर्ष निर्माण झालेला होता.पालकांकडून चालू शैक्षणिक वर्षात फी मध्ये पन्नास टक्के सवलतीची जोरदार मागणी करण्यात आली होती.या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत हा तोडगा निघाल्याने संस्थाचालक व पालक यांच्यातील वाद मिटण्याची अपेक्षा आहे.


