
मुंबई :
राष्ट्रीय राजकारणात सक्रीय असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांचा लोकसभेत आवाज घुमला आहे,लोकसभेच्या पाच अधिवेशनात सुप्रिया ताईंनी ३१३ प्रश्न मांडले.लोकनेते शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रिया ताई राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत.
महाराष्ट्रातील २०१९ ची विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या घडामोडींत त्यांच्या कामाची चुणूक महाराष्ट्राने पाहिली. सुप्रिया ताईंना राजकारणाची आणि समाजकारणाची जाण आहे. संयमी आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर सुप्रिया सुळे यांचा आवाज संसदेत वेळोवेळी घुमतो.
‘संपर्क’ या धोरणविषयक अभ्यास व पाठपुरावा करणाऱ्या संस्थेने महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या लोकसभेतील कामगिरीचा आढावा घेत शुक्रवारी (दि. १८ जून) अहवाल प्रकाशित केला. मे २०१९ ते मार्च २०२१ या काळातील लोकसभेच्या ५ अधिवेशनांत विचारलेल्या तारांकित व अतारांकित प्रश्नांसंदर्भातील माहितीचे विश्लेषण या अहवालात करण्यात आले.
या अहवालानुसार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक म्हणजे ३१३ प्रश्न लोकसभेत उपस्थित केलेत. तर सोलापूरचे खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामी यांनी सर्वात कमी म्हणजे केवळ २० प्रश्न पटलावर आणले.
१७ व्या लोकसभेतील एकूण ५ अधिवेशनांत महाराष्ट्रातील ४८ खासदारांनी दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी एकूण ६ हजार ९४४ इतके प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींचे लोकसभेतील एकूण प्रमाण ९ टक्के आहे. तरी या खासदारांनी सभागृहात मांडलेल्या प्रश्नांचे प्रमाण २९ टक्के इतके लक्षणीय राहिले. अभ्यासासाठी निवडलेल्या १० मंत्रालयीन खात्यांपैकी सर्वाधिक ५०७ प्रश्न हे आरोग्याशी निगडीत असल्याचे संपर्क संस्थेच्या अहवालात दिसून आले.
गेल्या पाच अधिवेशनांत महाराष्ट्रातील खासदारांनी सरासरी १५४ प्रश्न विचारले. राष्ट्रीय पातळीवर ही सरासरी केवळ ४९ प्रश्न एवढी आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रातील खासदारांची प्रश्न विचारण्याची सरासरी ही राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट ठरली. ५ अधिवेशनात मिळून संसदेत विचारल्या गेलेल्या एकूण २३ हजार ९७९ प्रश्नांपैकी महाराष्ट्रातील ३८ पुरुष खासदारांनी विचारलेले एकूण ५ हजार ९४६ तर ७ महिला खासदारांचे ९९८ प्रश्न समाविष्ट आहेत.
मानवसंसाधन विकासाबाबत विचारल्या गेलेल्या २५४ प्रश्नांपैकी सुप्रिया सुळे, सुनील तटकरे व सुधाकर श्रृंगारे यांनी अनुक्रमे १५, १४ व १३ प्रश्न मांडले. शेती व शेतकरी विकासाबाबत ४१८ प्रश्न पुढे आले. यात श्रीरंग बारणे, संजय मंडलिक व गजानन कीर्तीकर या तीनही शिवसेना खासदारांनी अनुक्रमे २७, २६ व २३ प्रश्न विचारले.


