
वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्था चालकांची शैक्षणिक फी संदर्भात बैठक आयोजित करण्यात यावी अशी सुचना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मांडली आहे.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे देशात व राज्यात
भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक कुटुंबातील व्यक्ती दगावलेल्या आहेत. गेल्या १५ महिन्याच्या कालावधीत लोकांचे रोजगार गेलेले आहेतह व्यवसाय बंद पडलेले आहेत.
नोकरदार, दुकानदार, वाहतुकदार, शेतकरी, शेतमजुर, व्यापारी इत्यांदीची आर्थिक कोंडी झालेली आहे. या सर्व कारणांमुळे नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालेले आहे. मावळ तालुक्यात देखील याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे.
याच पार्श्वभूमीवर मागील शैक्षणिक वर्षे २०२०/२१ ला मावळ तालुक्यातील सर्व शिक्षण संस्थाची सहविचार सभा घेऊन अशा परिस्थितीत पालकांनी कमीत कमी किती फी भरावी याबाबत एकमत करण्यात पुढाकार घेतलेला होता,असे सांगून माजी बाळा भेगडे म्हणाले,’
याही शैक्षणिक वर्षे २०२१/२२ ला कोरोना
मुळे तीच स्थिती पुन्हा समोर आलेली आहे. मावळ तालुक्यातील शिक्षण संस्थानी, अनेक पालकांनी व तसेच मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी सुद्धा अशा प्रकारची एकत्रित बैठकीसाठी पुढाकार घेऊन आयोजित करावी अशी मागणी केलेली आहे.
याच पार्श्वभूमीवर भेगडे यांनी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना या आशयाचे निवेदन देऊन
मावळच्या जनतेला व विशेषतः विद्यार्थ्याच्या पालकांना फी मध्ये सवलत देण्यासंदर्भात सर्व शिक्षण संस्था चालकांची, गटशिक्षणकारी, गटविकास अधिकारी पं.स.मावळ व तहसीलदार या संर्वाच्या उपस्थितीत लवकरात लवकर बैठकीचे आयोजन केले जावे अशी अपेक्षा वजा सुचना केली आहे.


