
वडगाव मावळ: कोकण अन मावळच्या सह्याद्रीच्या पश्चिम सीमेवरील असणारा गड म्हणजे ढाकगड.
धाक म्हणजे वचक.येथील सर्व परिसरात आपल्या अजस्रबाहुने नैसर्गिक धाक निर्माण करणारा ढाक गड.
या गडाच्या पोटात एका लेणीत मावळ व कोकण भागातील लोकांचे श्रद्धास्थान असलेला भैरवनाथ म्हणजेच ढाक बहिरी. ही लेणी म्हणजे ढाकगडाच हे एक अंग आहे.ज्ञात कालखंडात समोरील आसमंतावर नजर ठेवण्यासाठी या लेणीचा वापर केला जात होता.बरेच जण हा गड आहे समजुन येतात व फक्त ही लेणी पाहून माघारी फिरतात.
पण गडाचे मुख्य अंग ह्या गडाच्या माथ्यावर आहे हे कित्येकांस माहितच नसते.याच दुर्लक्षितपणा मुळे हा भरभक्कम गड कायमच उपेक्षित राहिला आहे.या गडावरील बऱ्याच वास्तु काळाच्या ओघात नष्ट होताना दिसत आहेत नव्हे झाल्या आहेत.
ढाकगडाची ओळख ही खुप कमी लोकांना आहे. केवळ लेणी म्हणजेच गड नाही, तर गडावर आणखिही वास्तू होत्या, पाण्याच्या टाक्या होत्या हे सर्वांना माहित व्हावं ढाकगडाची ह्या परिसरावर धाकाची ओळख सर्वाना व्हावी.बा रायगड परिवाराने सुरूवातीला येथे भटकंती मोहीम केली व मोहीमेतील सर्वांना गडाची ओळख करून दिली. पण येथील वास्तुंची दुरावस्था व गडाचा उपेक्षितपणा परिवाराने संवर्धन कार्यातुन दुर करायचे हि खुणगाठ त्याच भटकंती मोहीमेत बांधली.
येथे गडावर काम करायचं म्हणजे सोप्प काम नाही. गडावर जायची वाट ही सोप्पी नाही अन त्यात आपली शिदोरी पाठीशी बांधून काम करण्याचे साहित्य घेऊन जायच म्हणजे अवघडच काम आहे.
गडावरील पाण्याच्या टाक्या, तटबंदी दरवाजा हा वारसा सवंर्धन कार्यातुन जपण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करतोय.पहिल्या संवर्धन मोहीमेत पुर्ण मातीने गाडलेलं टाकं मोकळ करुन त्यास मुळ स्वरुपात आणण्याचा प्रयत्न केला. कित्येक वर्षांची माती वाहुन हे टाकं जमिनीच्या उदरातच जात होते,नष्ट होण्याच्या मार्गावर होते. ते काय एक, दोन मोहीमांनी साफ होणार नाही हे लक्षात आल्यावर, पहिल्या मोहीमेत टाक्याचा काही भाग मोकळा केला. दुसरी मोहीम ही दोन दिवसांची ठरवली अन १६ जणांच्या टिम पुर्ण २ दिवस हाताला फोड येईतो पर्यंत राबली. एकच ध्यास मनात होता की टाकं मोकळं झाल पाहिजे. लवकरच हे टाकं मोकळा श्वास घेणार आहे.गडावरील वास्तुंच लोकेशन डॉक्यूमेंटेशन करुन लवकरच सर्वां समोर आणण्याचा परिवाराचा मानस आहे.ढाकगड संवर्धन मोहीमेतील सर्व सदस्यांचे खुप खुप कौतुक.
तुमच्या ह्या प्रयत्नाने हा गडपुरुष नक्कीच आनंदला असेल.
दुसऱ्या मोहीमेत मंदिराचे अवशेष मिळाले. ही ढाक गडपुरुषाची कौतुकाची थापच आहे.



